दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील दिल्ली वर्सेस रेल्वे यांच्यातील रणजी लढतीला 'विराट' कव्हरेज मिळालं. दिल्लीतील माहोल असा होता की, जणून आयसीसीच्या नॉकआउट राउंडमधील सामनाच इथं रंगला आहे. यामागचं कारण एकच होतं ते म्हणजे विराट कोहली बऱ्याच वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीनं टॉस जिंकला अन् पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता फिल्डिंग वेळी कोहलीची झलक पाहायला मिळाली, पण कमबॅक मॅचच्या पहिल्या दिवसाच्या खेळात त्याची बॅटिंग पाहायला न मिळाल्यामुळे तुफान गर्दीतील अनेकजण 'दर्दी'ही झाले असतील. पण आता ती प्रतिक्षा संपणार आहे. कारण दुसऱ्या दिवशी विराट कोहली कदाचित पॅड बांधूनच बसल्याचे दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जवळपास १५ हजार प्रेक्षकांची उपस्थितीत
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामन्यासाठी विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येनं स्टेडियमवर हजेरी लावली होती. आयएएनएसच्या वृत्तानुसार पहिल्या दिवशी स्टेडियमवर १५ हजार प्रेक्षक उपस्थितीत होते. पण या मंडळींना पहिल्या दिवशी फक्त अन् फक्त कोहलीची फिल्डिंग वेळीची झलकच पाहावी लागली. पण दुसरा दिवस दिल्लीकरांसाठी एकदम खास ठरु शकतो. कारण विराट कोहली बॅटिंगसाठी तयार होऊनच बसलेला दिसू शकतो.
दिल्लीकर आपल्याच संघाच्या विकेटसाठी करताना दिसली प्रार्थना
पहिल्या दिवसाच्या खेळात रेल्वेच्या संघाचा पहिला डाव २४१ धावांत आटोपला. दिल्लीच्या संघाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली अन् संघानं एक विकेटही गमावलीये. संघाच्या धावफलकावर ११ धावा असताना अर्पित राणाच्या रुपात दिल्लीचा पहिला धक्का बसला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दिल्लीच्या संघाने एक बाद ४१ धाावा केल्या होत्या. सनत सांगवान ९ (२८) आणि यश धुल १७ (२५) जोडी मैदानात खेळत होती. दिल्लीच्या संघानं बॅटिंग ऑर्डरमध्ये काही बदल केला नाही तर आणखी एक विकेट पडली की, विराट कोहलीची बॅटिंगसाठी मैदानात एन्ट्री पाहायला मिळेल. आता विराटला बॅटिंगसाठी लवकर पाहण्यासाठी दिल्लीकरांनी दुसऱ्या दिवशी आपल्याच संघाची विकेट पडावी, ही प्रार्थना केली तर ते नवल वाटणार नाही.
कितव्या क्रमांकावर बॅटिंग करणार विराट?
भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली रणजी मॅचमध्येही आपल्या नियमित चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसू शकतो. दिल्लीच्या संघाने पहिली विकेट स्वस्तात गमावल्यावर सांगवान-यश धुल जोडी जमली आहे. दोघांनी ३० धावांची भागीदारी केली असून ते दुसऱ्या दिवशी दिल्लीला मजबूत स्थितीत नेण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. ही विकेट पडली की, विराट कोहलीची मैदानात एन्ट्री पाहायला मिळू शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी स्टेडियमवर पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक गर्दी पाहायला मिळू शकते.
Web Title: Delhi vs Railways Ranji Trophy Virat Kohli Turns Heads On Ranji Return Despite Not Batting Over 15,000 Attend Day To Star Batter May Be Come For Batting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.