वायनाड (केरळ) : उमेश यादवच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या लढतीत विदर्भ संघाने एक डाव व 11 धावांनी केरळला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. उमेश यादवने दोन्ही डावांत मिळून एकूण 12 विकेट्स घेतल्या. केरळचा पहिला डाव 106 धावांत गुंडाळल्यानंतर विदर्भने 208 धावा केल्या. दुसऱ्या डावातही केरळच्या फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली आणि त्यांचा डाव 91 धावांत गडगडला. उमेशने पहिल्या डावात 7, तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या.
नाणेफेक जिंकून विदर्भने यजमान केरळला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. मात्र, उमेशच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव 106 धावांत आटोपला. उमेशने 48 धावांत 7 विकेट घेतल्या. प्रथमश्रेणी कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. याआधी उमेशने 74 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. अन्य तीन फलंदाजांना वेगवान रजनीश गुरबानी याने बाद केले. विदर्भाने केवळ तीन गोलंदाजांचा वापर केला. प्रत्युत्तरात विदर्भने फैज फजलच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर 208 धावांपर्यंत मजल मारून 102 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावत केरळच्या संघाची त्रेधातिरपीट उडाली. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्य 91 धावांवर तंबूत परतला. उमेशने 31 धावांत 5 विकेट घेतल्या, तर यश ठाकूरने 28 धावांत 4 विकेट घेतल्या.