मॅन्चेस्टर : इंग्लंडविरुद्ध कमी धावसंख्येच्या लढतीत २४ धावांनी पत्करावा लागलेल्या पराभवाचा आॅस्ट्रेलियन संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने व्यक्त केले. या लढतीत लक्ष्याचा पाठलाग करताना सुस्थितीत असलेला आॅस्ट्रेलियाचा डाव ढासळला. वॉर्नने वन-डे मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील कामगिरीची आठवण करताना म्हटले की, ‘त्या लढतीपूर्वी आॅस्ट्रेलियाने प्रदीर्घ कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नव्हते. त्यामुळे त्यांना मालिका गमवावी लागली, हे समजण्यासारखे होते. त्यानंतर संघाची कामगिरी सुधारली, पण या लढतीचा निकाल त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम करणारा असेल.’ (वृत्तसंस्था)