भारतीय महिला संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या फिरकीची जादू दाखवून देत आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील कामगिरीच्या जोरावर महिला टी-२० क्रमवारीत गोलंदाजांच्या गटात तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम रॅकिंगसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीये. कामगिरीतील सातत्य कायम ठेवून पहिल्यांदाच नंबर वनचा ताज मिरवण्याची संधी तिच्याकडे आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकच्या खेळाडूला मागे टाकत नंबर वन होण्याची संधी
आयसीसीच्या क्रमवारीत महिलांच्या गोलंदाजी गटात पाकिस्तानची सादिया इक्बाल अव्वलस्थानावर आहे. तिच्या खात्यात ७४६ रेटिंग पॉइंट्स आहेत. दीप्ती शर्मानं आपल्या खात्यात ४३८ रेटिंग पॉइंट्स जमा करत दुसऱ्या स्थानावर झेप घेताना ऑस्ट्रेलियन ॲनाबेल सदरलँड हिला मागे टाकले. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यात सर्वोत्तम कामगिरीसह दीप्ती नंबर वनच्या स्थानावर पोहचू शकते.
रेणुका सिंह ठाकूर टॉप १० मध्ये तर अरुंधती रेड्डीची 'उंच उडी'
इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत अरुंधती रेड्डीनंही चांगली कामगिरी करून दाखवलीये. इंग्लंड महिला संघाविरुद्ध ओव्हलच्या मैदानातील तिसऱ्या टी-२० सामन्यात ३ विकेट्स घेत तिने ११ स्थानांनी उंच उडी मारलीये. टी-२० क्रमवारीत ती ४३ व्या क्रमांकावर आहे. दीप्तीशिवाय T20I रँकिंगमध्ये रेणुका सिंह ठाकूर ७०६ रेटिंग पॉइंट्ससह सहाव्या स्थानावर आहे.
दीप्त या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळेही आहे चर्चेत
दीप्ती शर्मानं वर्कलोड मॅनेजमेंटसाठी इंग्लंडमधील 'द हंड्रेड' महिला स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ती या स्पर्धेत लंडन स्पिरिट संघाचा भाग होती. गत वर्षी या संघाने जेतेपदही पटकावले होते. पण यावेळी दीप्तीनं या स्पर्धेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने तिच्या बदली ऑस्ट्रेलियाची ऑलराउंडर चार्ली नॉट हिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.