नॉटिंगहॅम : इंग्लंड संघाने मंगळवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 397 धावा चोपून काढल्या. इयॉन मॉर्गनने 71 चेंडूंत 148 धावांची विक्रमी खेळी करताना तब्बल 17 षटकार खेचले होते. वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटक ठोकण्याचा विक्रम मॉर्गनने नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये 397 धावा या फार वाटत नसल्या तरी गतवर्षी आजच्याच दिवशी इंग्लंड संघानं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता आणि ऑस्ट्रेलियाला रडू आवरले नव्हते. चला तर फ्लॅशबॅकमध्ये जाऊया...
19 जून 2018 मध्ये नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या वन डे सामन्यात इंग्लंडने स्वतःचाच विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात इंग्लंडने 481 धावा चोपल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला 242 धावांनी नमवून मालिकाही खिशात घातली होती. वन डे क्रिकेटमधील इंग्लंडचा तो सर्वात मोठा विजय ठरला, शिवाय वन डे क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरला. यापूर्वीचा विक्रमही इंग्लंडच्याच ( 444 धावा वि. पाकिस्तान, नॉटिंगहॅम 30 ऑगस्ट 2016) नावावर होता.
पाहा व्हिडीओ...
इंग्लंड 500 धावांचा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते, परंतु त्यांना अखेरच्या 16 चेंडूंत 22 धावा करता आल्या. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया धावांचा पाठलाग करू शकले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 37 षटकांत 237 धावांत तंबूत परतला. आदिल रशीदने 47 धावांत 4 विकेट घेतल्या.