Join us

'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा

Daren Sammy West Indies cricket Nicholas Pooran: अनुभवी खेळाडूने व्यक्त केली भीती, दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:57 IST

Open in App

Daren Sammy West Indies cricket Nicholas Pooran: गेल्या काही आठवड्यात अनेक स्टार खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. यामध्ये ताजे नाव वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन आहे. निकोलस पूरनने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडत सर्वांना आश्चर्यचकित केले. अशा परिस्थितीत आता वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने निकोलस पूरनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना वेस्ट इंडिज क्रिकेटसमोरील एक मोठे आव्हान अधोरेखित करत असल्याचे सॅमी म्हणाला. तसेच, आणखी काही क्रिकेटर्स लवकरच निवृत्ती घेतील, असेही तो म्हणाला.

डॅरेन सॅमीचा धक्कादायक दावा

पूरन हा वेस्ट इंडिजसाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने कधीही कसोटी क्रिकेट खेळलेले नाही आणि त्याची शेवटची एकदिवसीय खेळी दोन वर्षांपूर्वी खेळली होती. त्याचा निर्णय देखील आश्चर्यकारक आहे. कारण टी-२० विश्वचषक फक्त आठ महिन्यांनंतर खेळला जाणार आहे. त्याच्या निर्णयामागे फ्रँचायझी क्रिकेट हे सर्वात मोठे कारण मानले जाते. तो फ्रँचायझी क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, डॅरेन सॅमीचा असा अंदाज आहे की येणाऱ्या काळात अधिक खेळाडू या मार्गाचा अवलंब करू शकतात आणि लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडू शकतात.

सॅमी पूरनबद्दल काय म्हणाला?

इंग्लंड दौऱ्यावर वेस्ट इंडिजच्या सलग सहाव्या पराभवानंतर पूरनच्या निवृत्तीबद्दल सॅमी म्हणाला, 'माझा आतला आवाज मला सांगत होता की असे काहीतरी घडेल. पूरनसारखे खेळाडू खरंतर संघात हवे आहेत. पण मी कोणाच्याही कारकिर्दीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी त्याला शुभेच्छा दिल्या, त्याने संघाला शुभेच्छा दिल्या. विश्वचषक येत आहे. त्याने आम्हाला निवृत्तीबाबत आधीच सांगितले होते, याचा मी आदर करतो. त्याच्याशिवाय आम्हाला नियोजन करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, म्हणून त्याने कल्पना दिली होती. आता निकोलस पूरनशिवाय रणनीतीवर पुढे जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

आणखी खेळाडू निवृत्त होतील...

टी२० क्रिकेटच्या वाढत्या ट्रेंडमुळे आणि फ्रँचायझी लीगच्या आकर्षणामुळे अधिक खेळाडू लवकर निवृत्त होऊ शकतात, असा अंदाजही सॅमीने व्यक्त केला. त्याने हेनरिक क्लासेन आणि क्विंटन डी कॉक सारख्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे उदाहरण दिले. ज्यांनी लहान वयात हा निर्णय घेतला आहे. सॅमी म्हणाला, 'मला खात्री आहे की अधिक खेळाडू या दिशेने वाटचाल करतील. तुम्ही पाहिले की प्रत्येकजण हेनरिक क्लासेन, क्विंटन डी कॉक, निवृत्त झालेल्या या खेळाडूंबद्दल बोलत आहे. हे आमच्या नियंत्रणाबाहेर आहे.'

टॅग्स :ऑफ द फिल्डवेस्ट इंडिजटी-20 क्रिकेट