Join us

महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक 

इंग्लंडच्या डॅनी वॅटने किया सुपर लीग महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 16:21 IST

Open in App

लंडन : इंग्लंडच्या डॅनी वॅटने किया सुपर लीग महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी साकारली. तिनं साऊदर्न व्हायपर्स संघासाठी 60 चेंडूंत तिनं 110 धावा चोपल्या. या लीगमध्ये शतक झळकावणारी ती इंग्लंडची पहिलीच खेळाडू ठरली. तिची ही खेळी या लीगमधील दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. 2017मध्ये सुझी बेट्सने 119 धावा चोपल्या होत्या आणि हा विक्रम वॅटला मोडता आला नाही. वॅटच्या फटकी खेळीच्या जोरावर व्हायपर्स संघाने 9 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात सरे स्टार्सचा संपूर्ण संघ 89 धावांत माघारी परतला. व्हायपर्सने हा सामना 89 धावांनी जिंकला.  

प्रथम फलंदाजी करताना व्हायपर्स संघाला सुझी बेट्स आणि वॅट यांनी शतकी भागीदारी करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकांत 109 धावा चोपल्या. बेट्सने 46 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 39 धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या पाच षटकांत वॅटने सरे स्टार्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिनं 60 चेंडूंत 9 चौकार व 7 षटकार खेचून 110 धावा चोपल्या. पण, 19व्या षटकात ती बाद झाली आणि अखेरच्या षटकात व्हायपर्सच्या तीन फलंदाजांना डॅन व्हॅन निएकर्कने बाद करताना हॅटट्रिक नोंदवली. त्यामुळे त्यांना 20 षटकांत 5 बाद 178 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात स्टार्सचा संपूर्ण संघ 16 षटकांत 89 धावांत माघारी परतला. स्टेफनी टेलर्सने 11 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तिला टॅश फॅरंट ( 2/17) आणि फि मॉरिस ( 2/13) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली.  वॅटने अवघ्या 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे शतकात रुपांतर करण्यासाठी तिनं केवळ 24 चेंडू खेळून काढले.''ही खेळपट्टी ट्रीकी होती. पहिल्या काही षटकांत सुझी आणि मला फलंदाजी करताना चाचपडल्यासारखे झाले. त्यामुळे सुरुवातीला संयमाने खेळ केला आणि जम बसल्यानंतर  फटकेबाजी केली,'' असे वॅटने सांगितले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दोनच महिला खेळाडूंच्या नावावर दोन शतकं आहेत आणि त्यात वॅटचा समावेश आहे. तिने 25 मार्च 2018मध्ये भारतीय महिला संघाविरुद्ध नाबाद 124 धावा कुटल्या होत्या.  

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटटी-20 क्रिकेटइंग्लंड