इंग्लंडच्या फलंदाजांनी आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेत सोमवारी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. डॅनीएल वॅटनं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावलं, तर टॅमी बीयूमोंटनं शतकी खेळी करत साजेशी साथ दिली. या दोघींच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर पाकिस्तानला पराभवाचा धक्का देताना 75 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 6 बाद 284 धावा केल्या. टॅमीनं 141 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीनं 107 धावांची खेळी केली. डॅनीएलनं 95 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकार खेचून 110 धावा चोपल्या. डॅनीएलचे वन डे क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. कर्णधार हिदर नाइटनं 44 चेंडूंत 41 धावांची खेळी करताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. पाकिस्तानच्या रमीन शमीमनं 3 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना अॅना श्रुब्सोले आणि कॅथरीन ब्रंट यांनी पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीला माघारी पाठवले. त्यानंतर इंग्लंडच्या अन्य गोलंदाजांनी पाकला धक्का देण्याचे सत्र कायम राखले. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफनं 94 चेंडूंत 69 धावा करताना संघर्ष केला. तिला उमैमा सोहैल ( 29) आणि आलिया रियाझ ( 39) यांची योग्य साथ लाभली, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. इंग्लंडच्या कॅट क्रूसनं 32 धावांत 4 विकेट्स घेतल्या. कॅथरीन आणि सराह ग्लेन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.