पोर्तो, UEFA Nations League Final: ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. त्याच्या फुटबॉल कौशल्याचे जगभरात चाहते आहेत. एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही तो महान आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या ( युएफा) नेशन लीग अंतिम सामन्यापूर्वी रोनाल्डोनं एका आजारी चिमुकल्यासाठी चक्क संघाची बस थांबवली. त्या चिमुकल्याला बरं वाटावं म्हणून त्यानं जादू की झप्पी पण दिली. रोनाल्डोच्या या कृतीवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पोर्तुगालसमोर नेशन लीगच्या अंतिम सामन्यात नेदरलँड्सचे आव्हान होते. या सामन्याला रवाना होत असताना रस्त्याच्या शेजारी एक 11 वर्षांचा मुलगा हातात रोनाल्डोच्या नावाचे फलक घेऊन उभा होता. टीमच्या बसमधून जात असताना रोनाल्डोनं त्या मुलाला पाहिले आणि बस थांबवायला सांगितले. रोनाल्डोनं त्या मुलाला बसमध्ये बोलावलं आणि जादूची झप्पी दिली. एडुआर्डो मोरेरा असे या मुलाचे नाव असून त्याला ल्युकेमिया ( रक्ताशी संबंधित आजार) हा आजार झाला आहे. त्यानं फलकावर रोनाल्डोकडे झप्पीची विनंती केली होती आणि रोनाल्डोनं ती पूर्ण केली.
दरम्यान,
पोर्तुगाल संघाने गोंसालो ग्युडेसच्या एकमेव गोलच्या जोरावर नेदरलँड्स संघाला 1-0 असे नमवून जेतेपद पटकावले.