Join us

कोरोनाचं संकट; भारत-श्रीलंका मालिका पाच दिवस पुढे ढकलली

कोरोना संकट : आता १८ जुलै पासून सामने; यजमान संघातील खेळाडू पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 06:56 IST

Open in App
ठळक मुद्देआता १८ पासून सामनेयजमान संघातील खेळाडू पॉझिटिव्ह 

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघातील अडचणी वाढल्या आहेत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना झाल्यानंतर आता खेळाडूलाही कोरोनाने ग्रासले . या संकटामुळे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले. आता ही मालिका १८ जुलैपासून सुरू होईल,असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी जाहीर केले.

ही मालिका आधी १३ जुलैपासून सुरू होणार होती, मात्र त्याआधी फलंदाजी कोच ग्रांट फ्लॉवर, डाटा विश्लेषक जीटी निरोशन हे पॉझिटिव्ह आढळले. श्रीलंका संघ नुकताच ब्रिटनच्या दौऱ्यावरून परतला होता. नव्या वेळापत्रकानुसार भारत श्रीलंका यांच्यातील वन डे सामने १८, २० आणि २२ जुलै रोजी प्रेमदासा स्टेडियमवर होतील. २५ जुलैपासून टी-२० मालिका खेळली जाईल. अखेरचे दोन टी-२० सामने २७ आणि २९ जुलै रोजी खेळविले जातील, असे शाह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

न्यूजवायरच्या वृत्तानुसार, संघासाठी तयार करण्यात आलेल्या बायोबबलमध्ये श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडीला कोरोना झाला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या डंबुला येथे असलेल्या शिबिरात सराव करीत होता.श्रीलंकेचा दुसरा संघ या सराव शिबिरात थांबला आहे. इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरवले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डांबुलामध्ये खेळाडूंचा एक नवीन संघ तयार केला होता. परंतु आता डंबुला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या संदुनला करोनाची लागण झाली आहे. भारतीय संघाने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून कोलंबोत सराव सुरू केला.

बीसीसीआयचे वैद्यकीय पथक एसएलसीच्या संपर्कातजय शाह म्हणाले,‘ कोरोनामुळे परिस्थिती विलक्षण आहे. अशावेळी बीसीसीआय श्रीलंका व्यवस्थापनाला सहकार्य करण्यास सज्ज आहे. आमचे वैद्यकीय पथक श्रीलंका क्रिकेटच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. मालिकेचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी सर्व प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करावे लागेल. उभय देशातील चाहते रोमहर्षक खेळाचा आनंद लुटतील,अशी आशा बाळगुया.’

श्रीलंका क्रिकेटचे सचिव ॲश्ले डिसिल्व्हा यांनी संकटकाळातील मदतीसाठी बीसीसीआयचे आभार मानले. ते म्हणाले,‘सहयोग देण्यासाठी तयार असलेल्या बीसीसीआयमुळे ही मालिका होईल. दीर्घकाळपासून आमच्यातील चांगल्या संबंधांमुळे हे शक्य झाले.’

टॅग्स :भारतश्रीलंकाकोरोना वायरस बातम्याबीसीसीआयजय शाह