भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर लिंगबदल करून मुलगी बनल्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली होती. आता त्याने अनाया बांगर हे नवे नाव आणि ओळख धारण केली आहे. आता अनाया बांगर एका मुलाखतीमुळे चर्चेत असून, त्यात तिने लिंगबदल करताना आपल्यासमोर आलेल्या आव्हानांचा उल्लेख करतानाच काही क्रिकेटपटूंवर सनसनाटी आरोपही केले आहेत.
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अनाया बांगर हिने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमधून आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना काही क्रिकेटपटूंनी आपल्याला त्यांचे न्यूड फोटो पाठवल्याचा तसेच शिविगाळ केल्याचा दावा केला. मात्र अनाया बांगर हिने कुठल्याही क्रिकेटपटूचं नाव घेतलेलं नाही. दरम्यान, लिंगबदल केल्यामुळे क्रिकेट कारकिर्दीसह जीवनावर कसा परिणाम झाला, याचाही अनुभव तिने मुलाखतीवेळी कथन केला.
काही क्रिकेटपटूंनी आपलं शोषण करण्याचा प्रयत्न केला, काही जण विवस्त्र फोटो पाठवायचे, शिविगाळ करायचे, असेही अनाया हिने मुलाखतीदरम्यान सांगितले. लिंगबदल केल्यानंतर सहकारी क्रिकेटपटूंकडून सहकार्य, पाठिंबा मिळाला का? असं विचारण्यात आलं असता अनाया बांगर म्हणाली की, काही जणांनी सहकार्य तर केलं. पण काही जणांनी मला छळण्याचा प्रयत्नही केला. काही क्रिकेटपटू असेही होते, ज्यांनी मला आपले विवस्त्र फोटो पाठवले, असे तिने सांगितले. तसे एक व्यक्ती मला सर्वांसमोर शिविगाळ करायचा. मात्र काही वेळाने ती व्यक्ती माझ्या जवळ येऊन बसायची आणि माझे फोटो मागायची, असेही तिने सांगितले.
याबरोबरच अनाया हिने मुलाखतीवेळी एक धक्कादायक गौप्यस्फोटही केला. तिने सांगितले की, एका दिग्गज क्रिकेटपटूने माझ्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा मी भारताता होते, तेव्हा मी एका माजी क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबाहत सांगितले होते. तेव्हा या क्रिकेटपटूने चल आपण कारमध्ये जाऊ, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, असं सांगितल्याचा दावाही अनाया हिने केला.