आयपीएल २०२१मधील यशस्वी पर्व संपवून मायदेशी परतलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं नवी कोरी गाडी खरेदी केली. इंस्टाग्रामवर त्यानं या गाडीचा फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आणि सूर्यकुमार यादवपासून ते सर्वांनी त्याचे अभिनंदन केलं. इंस्टावर पोस्ट केलेल्या एका फोटोत पृथ्वी मुंबईच्या रस्त्यांवर ही गाडी चालवताना दिसत आहे. त्यानं BMW 6 Series Gran Turismo ही गाडी खरेदी केली आहे आणि BMW 630i M Sport सेगमेंटमधील ही गाडी आहे.
याच वर्षी या गाडीचं लाँचिंग झालं असून पृथ्वीनं सफेद रंगाला पसंती दिली. या गाडीची (ex-showroom किंमत ही ६८.५० लाख इतकी आहे. BMW 6 Series GT ही गाडी 630i M Sport, 620d Luxury Line आणि 630d M Sport या व्हेरिएंटमध्ये मिळत आहे. या गाडीची किंमत ६८.५० लाख ते ७९.२० लाख ( ex-showroom) इतकी आहे.
पृथ्वी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर त्यानं मायदेशात झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत ८००+ धावा चोपून विक्रम केला. पण, त्याची निवड करण्यात आलेली नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी त्याचा राखीव सलामीवीर म्हणून विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, तसेही काही झाले नाही. त्यानं ५ कसोटीत ३३९ धावा, ६ वन डेत १८९ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१त त्यानं १५ सामन्यांत ४७९ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो ७व्या क्रमांकावर राहिला.