Tegan Williamson Spin bowling Wicket, Viral Video : मलेशिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या १९ वर्षाखालील टी२० क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडीजचा चक्काचूर केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या महिलांना १६.३ षटकांत केवळ ५३ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ११ षटकांतच सामना जिंकला. ऑस्ट्रेलियन महिलांनी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी केली. या सामन्यातील तेगान विल्यम्सन हिने स्पिन गोलंदाजीवर घेतलेली विकेट विशेष चर्चेत राहिली.
वेस्ट इंडीजचा महिला संघ फलंदाजी करत असताना समारा रामनाथ हिने १४ तर ब्रियाना हरिचरन हिने १७ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. या सामन्यात तेगान विल्यम्सन हिने टाकलेला एक चेंडू वाहवा मिळवून गेला. नवव्या षटकात तेगान गोलंदाजीला आली. तिसऱ्या चेंडूवर तिने लेग स्पिन चेंडू टाकला. अम्रिता रामताहल फलंदाजी करत असताना चेंडू अचानक आत वळला आणि ती क्लीन बोल्ड झाली. काहीही कळण्याआधीच ती त्रिफाळचीत झाली. या विकेटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. पाहा व्हिडीओ-
असा रंगला सामना
ऑस्ट्रेलियन महिला संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत वेस्ट इंडीजवर हल्ला चढवला. वेस्ट इंडिजकडून कॅलेंडर (१), कंबरबॅच (०), क्लाक्सटन (१), रामताहल (६), कॅसर (०), ब्रायस (५), क्रीस (३) आणि डीएन (०) या आठ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाल्या. सलामीवीर समारा रामनाथ हिने २ चौकारांसह १४ धावा केल्या तर मधल्या फळीत ब्रियाना हरीचरन हिने १ चौकार मारून १७ धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने ५३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मॅकॉन (०), पेले (११) आणि हॅमिल्टन (२८) या तिघी बाद झाल्या. पण काओम्हे ब्रे हिने नाबाद ११ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.