Ashton Agar batting with one hand Video: ऑस्ट्रेलियन खेळाडू अश्टन अगार याची आज तुफान चर्चा रंगली आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने धाडस आणि साहसाचे एक नवे उदाहरणच दाखवून दिले. त्याने दाखवलेल्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत शेफिल्ड शिल्ड टूर्नामेंटमधील एका सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. तसे असूनही तो आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या आगरला वेदना सहन होत नसतानाही त्याने एका हाताने व्हिक्टोरियाच्या वेगवान आणि फिरकी आक्रमणाचा सामना केला.
अखेरच्या विकेटसाठी केली महत्त्वपूर्ण भागीदारी
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात ३१० धावांवर ९ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर वेदनेने त्रस्त असलेला अश्टन अगार ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. व्हिक्टोरियाविरुद्ध शतक झळकावणारा सहकारी खेळाडू जोएल कर्टिस याला अगारने चांगली साथ दिली आणि संघासाठी महत्त्वपूर्ण १५ धावांची भर घातली. या भागीदारीच्या जोरावर त्यांच्या संघाला ३२५ धावांपर्यंत मजल मारता आली. यात अगारने एका धावेचेही योगदान दिले नाही, कारण खांद्याच्या दुखापतीमुळे तो एकही शॉट खेळू शकला नाही. पण अगार प्रत्येक चेंडूचा बचाव करत होता. अखेर सॅम इलियटने अप्रतिम यॉर्कर टाकत आगरला झेलबाद केले. त्यामुळे सोशल मीडियावर सगळेच अगारचे कौतुक करत आहेत.
अगारच्या संघाला अंतिमत: विजय मिळवता आला नाही. व्हिक्टोरियाने हा सामना ८ गडी राखून जिंकला. व्हिक्टोरिया संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले आणि अवघ्या १६७ धावांच्या स्कोअरवर ऑल आऊट केले. त्यानंतर प्रत्युत्तरात त्यांनी ३७३ धावा केल्या आणि पहिल्या डावात २०६ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात अगारच्या संघाने चांगली फलंदाजी करत ३२५ धावा केल्या, ती आघाडी पुरेशी ठरली नाही. अखेर ११९ धावांचे आव्हान व्हिक्टोरियाने ८ विकेट्स राखून पार केले.