Cricket Fight Video : दिल्ली प्रीमियर लीग (DPL) २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्सचा कर्णधार नितीश राणाची बॅट तळपली. त्याने साउथ दिल्ली सुपरस्टार्सविरुद्ध फक्त ४२ चेंडूत शतक झळकावले आणि आपल्या संघाला या लीगच्या क्वालिफायर-२ मध्ये नेले. यादरम्यान त्याने १५ षटकार मारले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या नितीश राणाने सामन्यादरम्यान सर्व गोलंदाजांची धुलाई केली. याचदरम्यान, नितीश राणाचे साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीशीही भांडण झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साउथ दिल्ली सुपरस्टार्सने २० षटकांत ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट दिल्ली लायन्सने १७ चेंडू शिल्लक असताना सात गडी राखून सामना जिंकला. कर्णधार नितीश राणा याने केवळ ४२ चेंडूत शतक झळकावून हा सामना पूर्णपणे एकतर्फी केला. त्याने ५५ चेंडूत ८ चौकार आणि १५ षटकारांसह नाबाद १३४ धावा केल्या. त्याने दिग्वेश राठीच्या एका षटकात सलग ३ षटकार मारले. यामुळे दिग्वेश राठी संतापला. मग पुन्हा गोलंदाजी करताना दोघांनी एकमेकांना हुल दिली. अखेर पुढच्याच चेंडूवर नितीश राणाने पुन्हा षटकार मारला. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला. यादरम्यान नितीशने दिग्वेशला बॅटही दाखवली. पंच आणि खेळाडूंनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.
पाहा व्हिडीओ-
दरम्यान, दिग्वेश राठीने वेस्ट दिल्ली लायन्सविरुद्ध खूप धावा दिल्या. त्याने २ षटकांत ३९ धावा दिल्या. त्यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.