Alick Athanaze ball hit on face, viral video: क्रिकेटमध्ये केव्हा काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेटच्या मैदानात कधीकधी जीवाला धोका निर्माण होणाऱ्या घटनाही घडतात. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या ब्रेकआउट टी-२० लीगच्या एका सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. तेथे एक धक्कादायक घटना घडली. हेल्मेटशिवाय फलंदाजी करणाऱ्या एका फलंदाजाच्या चेहऱ्यावर चेंडू आदळला. अँलिक अथानाझे असं त्या फलंदाजाचं नाव असून त्याच्या अर्धशतकानंतर हा प्रकार घडला.
दुखापत होण्यापूर्वी ३४ चेंडूत अर्धशतक
लाईव्ह सामन्यात कॅरेबियन फलंदाजासोबत अपघात झाला तेव्हा तो अर्धशतक झळकावल्यानंतर फलंदाजी करत होता. ब्रेकआउट टी-२० लीगमध्ये विंडवर्ड आयलंड आणि गयाना रेनफॉरेस्ट यांच्यात सामना खेळला जात होता. या सामन्यात विंडवर्ड आयलंड संघ प्रथम फलंदाजी करायला आला. सलामी जोडी फक्त ९ धावांवर तुटल्यानंतर अँलिक अथानाझे देखील या संघाचा भाग होता. अथानाझेने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि केवळ ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
चेहऱ्यावर आदळला चेंडू
५० या धावसंख्येवर खेळत असताना समोरच्या फिरकी गोलंदाजाला पाहून अथानाझेने हेल्मेट न घालता खेळायला सुरुवात केली. गयाना रेनफॉरेस्ट संघाचा फिरकी गोलंदाज लतीफच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना अथानाझचा अंदाज चुकला. चेंडू थेट त्याच्या तोंडावर लागला. पाहा व्हिडीओ-
चेंडू लागताच अथानाझेने चेहऱ्याचा तो भाग दाबून ठेवला. सुदैवाने, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि तो पुन्हा खेळण्यास तयार झाला. पण त्या घटनेने काही क्षणांसाठी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.