Caribbean Premier League 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) शुक्रवारी धमाकेदार आतषबाजी पाहायला मिळाली. जमैका तल्लावाह्स ( Jamaica Tallawahs) आणि सेंट ल्युसी किंग्स ( St Lucia Kings) यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३९० धावा चोपल्या. त्यापैकी जमैकानं ५ बाद २५५ धावा कुटून रिकॉर्ड नोंदवला अन् त्या रिकॉर्डमध्ये आंद्रे रसेलचा ( Andre Russell) खूप मोठा वाटा होता. रसेलनं ३७५च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली. CPLमध्ये पदार्पण करणाऱ्या अन् आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बँगळुरूकडून ( RCB) खेळणाऱ्या टीम डेव्हीड यानंही त्याच्या आक्रमकतेची झलक दाखवली. जमैकानं हा सामना १२० धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या जमैकाच्या सलामीच्या जोडीपासून ते पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत सर्वांना किंग्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. चॅडविक वॉल्टन व केन्नार लेवीस यांनी पहिल्या ६ षटकांत ८१ धावा कुटल्या. लेवीस २१ चेंडूंत २ चौकार व ५ षटकार खेचून ४८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या हैदर अलीनं दाणपट्टा चालवला. वॉल्टन २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ४७ धावांवर बाद झाला. हैदरनं ३२ चेंडूंत ४५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा केल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलनं ३८ धावांचे योगदान दिले. पण, आंद्रे रसेलनं १४ चेंडूत ५० धावा कुटल्या. त्यानं ३ चौकार व ६ षटकार खेचून अवघ्या ९ चेंडूंत ४८ धावा केल्या. जमैकानं ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या किंग्सकडून टीम डेव्हीड व वाहब रियाझ यांनी संघर्ष केला. सिंगापूरचा फलंदाज डेव्हीड यंदा प्रथमच आयपीएलमध्येही खेळणार आहे. त्याला विराट कोहलीच्या RCBनं करारबद्ध केले आहे. डेव्हीडनं २८ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या, तर रियाझनं २६ धावांचे योगदान दिले. किंग्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकांत १३५ धावांवर गडगडला. मिगेल प्रेटोरियसनं सर्वाधिक ४, तर इम्रान खाननं तीन विकेट्स घेतल्या.