किंग्स्टन, कॅरेबिनय प्रीमिअर लीग : वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेटनं पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरी करताना सेंट किट्स अँड नेव्हिल्स पॅट्रीओट्स संघाला अश्यप्राय विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या सामन्यात ब्रॅथवेटनं फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल दाखवताना किंग खान शाहरुख खानच्या त्रिंबागो नाइट रायडर्स संघाला पराभवाची चव चाखवली. रायडर्सच्या 4 बाद 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रीओट्सनेही 7 बाद 216 धावा केल्या. ब्रॅथवेटनं तुफान फटकेबाजी करून हा सामना बरोबरीत आणला आणि सुपर ओव्हरमध्ये ब्रॅथवेटने गोलंदाजीतही कमाल दाखवली.
लेंडल सिमन्सने 45 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकार खेचून 90 धावा करताना रायडर्सला मोठी धावसंख्या गाठून दिली. ब्रॅथवेटने 48 धावांत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीतही ब्रॅथवेटने आपली ताकद दाखवली. पॅट्रीओट्सचे 4 फलंदाज 80 धावांत माघारी परतल्यानंतर ब्रॅथवेटनं एकहाती खिंड लढवली. इव्हान लुईसनं 21 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 45 धावांची खेळी केली. पण, अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. पॅट्रीओट्सला अखेरच्या 60 चेंडूंत 124 धावांची गरज होती. तेव्हा कर्णधार ब्रॅथवेटनं 30 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 64 धावा चोपल्या. पण, तो बाद झाला आणि पॅट्रीओट्सच्या विजयाच्या आशा धुसर बनल्या.
अखेरच्या षटकात विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असताना रयाद एम्रीट्स ( 21*) आणि अल्झारी जोसेफ ( 7*) यांनी सामना बरोबरीत सोडवला. जीमी निशॅमच्या अखेरच्या षटकात पॅट्रीओट्सच्या फलंदाजांना 18 धावा करता आल्या. एम्रीट्सने अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही लुईस आणि ब्रॅथवेट यांनी पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी केली. अली खानच्या पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर ब्रॅथवेटनं षटकार खेचले. अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून ब्रॅथवेटनं रायडर्ससमोर विजयासाठी 19 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर गोलंदाजीतही कमाल दाखवताना ब्रॅथवेटनं सुपर ओव्हरमध्ये पाच धावा व एक विकेट घेत पॅट्रीओट्सला थरारक विजय मिळवून दिला.