Join us

CPL 2019 : शाहरुखच्या संघानं कोहलीच्या RCBचा विक्रम मोडला; ट्वेंटी-20 नवा पराक्रम घडला

कॅरेबियन प्रीमिअर लीग : चौकार-षटकारांच्या आतषबाजीचं सत्र कायम राखताना कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 12:38 IST

Open in App

किंग्स्टन, कॅरेबियन प्रीमिअर लीग : चौकार-षटकारांच्या आतषबाजीचं सत्र कायम राखताना कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली. त्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमैका थलावाज संघांतील या सामन्यात तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मालकी हक्क असलेल्या नाइट रायडर्स संघाने शनिवारी ट्वेंटी-20 नव्या पराक्रमाची नोंद करताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) च्या नावावर असलेला सहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. नाइट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना जमैका संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. लेंडल सिमन्स आणि कॉलिन मुन्रो या जोडीनं तुफान फटकेबाजी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. सिमन्सने सलामीला येताना सुनील नरीनसह पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अफगाणिस्तानचा गोलंदाज झहीर खाननं नरीनला 20 धावांवर तंबूत पाठवले. पण, त्यानंतर सिमन्स आणि मुन्रोची जोडी जमली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. सिमन्सने 42 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकार खेचून 86 धावा केल्या, तर मुन्रोने 50 चेंडूंत 6 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 96 धावांची खेळी केली. किरॉन पोलार्डने 17 चेंडूंत नाबाद 45 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर नाइट रायडर्सने 20 षटकांत 2 बाद 267 धावा चोपल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना जमैका संघाला 5 बाद 226 धावांपर्यंतच मजल मारता आली. ख्रिस गेल ( 39), ग्लेन फिलिप्स ( 62), जॅव्हेल ग्लेन ( 34*) आणि रमाल लुईस (37*) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. नाइट रायडर्सने नोंदवलेली खेळी ही ट्वेंटी-20 प्रकारातील तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली. कॅरेबियन लीगमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. या कामगिरीसह नाइट रायडर्स संघाने इंडियन प्रीमिअर लीगमधील RCB संघाच्या 5 बाद 263 धावांचा विक्रम मोडला. RCBनं 2013मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध ही खेळी केली होती. त्या सामन्यात गेलने 66 चेंडूंत 175 धावा चोपल्या होत्या. या विक्रमात अफगाणिस्तान ( 3 बाद 278 वि. आयर्लंड, 2019) आणि झेक प्रजासत्ताक ( 4 बाद 278 वि. टर्की, 2019) हे संघ आघाडीवर आहेत.

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगशाहरुख खानविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू