Join us  

खेळापेक्षा देश नक्कीच मोठा आहे, सांगत आहेत बीसीसीआयचे माजी सचिव

हरभजन सिंगने तर भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकातही खेळू नये, अशी भूमिका घेतली होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:33 PM

Open in App

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानशी खेळावे की नाही, हा प्रश्न ऐरणीवर आहे. भारताच्या बऱ्याच खेळाडूंनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयनेही मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयच्या माजी सचिवांनी तर खेळापेक्षा देश नक्कीच मोठा आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

 भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आता पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचे म्हटले होते. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने तर भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकातही खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. बीसीसीआयचे माजी सचिव संजय पटेल यांनी हरभजनच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर देशापेक्षा खेळ कधीच मोठा होऊ शकत नाही, असे विधानही केले आहे.

संजय पटेल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " भारतामध्ये एवढा भयावह हल्ला झाला आहे. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानशी कसे खेळू शकतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मला वाटते की, आगामी विश्वचषकात भारताने पाकिस्तानबरोबर खेळू नये."

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पडसाद आता क्रीडा क्षेत्रावरही उमटत आहेत. कारण सीसीआय क्लबनंतर  मोहाली आणि राजस्थान क्रिकेट संघटनांनी आपल्या स्टेडियम्समधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढले होते. आता भारताची राजधानी दिल्लीमधूनही पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढले जात आहेत. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळाडूंच्या फोटोजची गॅलरी आहे. या गॅलरीमधून आता पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत. पंजाब येथील मोहालीच्या पीसीए स्टेडियममधूनही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या फोटोंना थारा देण्यात आलेला नाही. नवी दिल्लीमध्ये फिरोझशाह कोटला हे क्रिकेटचे स्डेडियम आहे. या स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या वसिम अक्रम,  आसिफ इकबाल, इंजमाम उल हक, शोएब अख्तर, जावेद मियांदाद, वकार युनिस यांच्यासह बारा पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या तस्वीरी आहेत. या सर्व तस्वीरी काढण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट संघटनेने घेतला आहे.

टॅग्स :पुलेला गोपीचंदभारतपाकिस्तानहरभजन सिंगगौतम गंभीर