नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन शशांक मनोहर यांना कोरोना व्हायरस महामारीमुळे आयसीसी बोर्डाची बैठक स्थगित होण्याची शक्यता लक्षात घेता कार्यकाळामध्ये दोन महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कोलिन ग्राव्हेस त्यांचे स्थान घेण्याची प्रबळ शक्यता आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष मनोहर तिसऱ्यांदा दोन वर्षांच्या कार्यकाळाची मुदतवाढ घेण्यास इच्छुक नसल्याचे मानले जात आहे.
आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने सांगितले,‘मनोहर जाणार असल्याचे निश्चित आहे, पण सध्या आणखी दोन महिने त्यांना पदावर कायम राहावे लागेल. जूनमध्ये आयसीसी वार्षिक बैठक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आॅगस्टमध्ये आयसीसीला नवा चेअरमन मिळण्याची शक्यता आहे.’
दरम्यान, बीसीसीआय विदर्भाच्या मनोहरांबाबत चिंतेत आहे. त्यांचे वर्तन अनेकांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विरोधात भासते.
बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले, ‘जोपर्यंत मनोहर अधिकृतपणे पद सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही. ज्यावेळी ते पद सोडतील त्यावेळी विश्वास वाटेल. अद्याप त्यांचा एक कार्यकाळ शिल्लक आहे. ऐनवेळी त्यांनी पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला तर परिस्थिती वेगळी राहील.’
हाँगकाँगच्या इम्रान ख्वाजा यांचेही नाव या पदाच्या शर्यतीत होते, पण त्यांना पूर्णकालिक सदस्यांचे समर्थन मिळाले नसल्याचे वृत्त आहे.
सूत्रांच्या मते, ग्रावेस यांना सर्व प्रमुख कसोटी देशांचे समर्थन आहे. बोर्डाच्या एका सदस्याने म्हटले की, ‘इंग्लंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या बोर्डाचे त्यांना समर्थन आहे. भारतीय बोर्डासोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत, पण बीसीसीआयने त्यांच्या दावेदारीचे अधिकृतपणे समर्थन केलेले नाही.’ मनोहर यांच्या तुलनेत ग्रावेस यांच्यासोबत बीसीसीआयचे संबंध चांगले राहतील, असे मानले जात आहे. मनोहर यांच्यावर आरोप आहे की एन. श्रीनिवासन यांच्या वेळी त्यांनी भारतीय हिताकडे दुर्लक्ष केले. (वृत्तसंस्था)
तिसºया टर्मसाठी दबाव वाढला
२०१६ मध्ये आयसीसीचे पहिले चेअरमन म्हणून सूत्रे स्वीकारणाºया मनोहर यांच्यावर सलग तिसऱ्यांदा हे पद स्वीकारण्यासाठी दबाव वाढत आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अलीकडेच आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या काही सदस्यांनी मनोहर यांची भेट घेतली आणि त्यांना तिसरी टर्म पूर्ण करण्याची विनंती केली. मनोहर यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले, ‘होय, आयसीसीच्या अनेक सदस्यांनी मला या पदावर कायम राहण्याची विनंती केली, पण माझी इच्छा नाही.’
नियम काय सांगतो
१५ सदस्यांच्या आयसीसीच्या घटनेनुसार चेअरमन पदावर एक व्यक्ती दोन-दोन वर्षांचे तीन कार्यकाळ पूर्ण करू शकते. बीसीसीआयच्या या माजी अध्यक्षांनी आतापर्यंत दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत. दोन्ही वेळा त्यांची सर्वसंमतीने बिनविरोध निवड झाली होती.