नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. वर्षाअखेरीस आॅस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे. १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात आॅस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता आॅस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले.
कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेचे आयोजन शक्य होईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलत २०२२ साली ही स्पर्धा खेळवली जावी, हा प्रस्ताव आयसीसीच्या २८ मे रोजी होणाºया बोर्डाच्या बैठकीत येण्याची शक्यता आहे. आयसीसीशी संलग्न असलेल्या महत्त्वाच्या क्रिकेट बोर्ड अधिकाºयाने वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
टी-२० विश्वचषकासाठी सध्या आयसीसी तीन पर्यायाचा विचार करीत आहे. यामध्ये पहिला पर्याय हा स्पर्धा वेळापत्रकानुसार खेळवत प्रत्येक संघाला आॅस्ट्रेलियात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे, प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवली जावी हा दुसरा पर्याय तर संपूर्ण स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलून २०२२ साली हे आयोजन करावे हा तिसरा पर्याय असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक संघातील १६ सदस्य,अधिकारी, टीव्ही सदस्य आणि सहयोगी स्टाफ इतक्या लोकांना क्वारंटाईन करणे कठीण होईल.(वृत्तसंस्था)