मेलबोर्न : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेळाडूंच्या आरोग्याप्रती जोखीम कमी करण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) चेंडूवर कीटकनाशकाचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आयसीसीची मान्यता घेतली जाईल. कोरोनाचे भय कायम असताना अशा वापरामुळे खेळाडूंच्या आरोग्याप्रती असलेली भीती कमी होण्यास मदत मिळेल, असा सीएचा अंदाज आहे.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे क्रीडा विज्ञान आणि क्रीडा वैद्यकीय शाखेचे व्यवस्थापक अॅलेक्स कोनटूरिस यांनी खेळाडूंच्या सुरक्षित सरावासाठी काही नियम तयार केले. त्यात हा विचार पुढे आला. स्पर्धात्मक क्रिकेटची सुरुवात मात्र दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आयसीसीने चेंडूला चकाकी आणण्यासाठी खेळाडूंच्या लाळेच्या वापरावर बंदी आणण्याची शिफारस केली. त्याला पर्याय म्हणून सामन्यादरम्यान चेंडूवर कीटकनाशकाचा वापर करणे खेळाडूंच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरेल की प्रभावी उपाय, याचे लवकरच परीक्षण केले जाणार असल्याची माहिती कोनटूरिस यांनी दिली. (वृत्तसंस्था)