नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला चेंडूवर थुंकीच्या वापरास बंदी आणण्याव्यतिरिक्त कोविड-१९ महामारीनंतर क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीमध्ये अधिक बदल होईल, असे वाटत नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद चेंडूवर लकाकी आणण्यासाठी थुंकी ऐवजी कृत्रिम पदार्थाचा वापर वैध ठरविण्याचा विचार करीत आहे.
गंभीर म्हणाला,‘अनेक नियमात व दिशानिर्देशांमध्ये बदल होईल, असे मला वाटत नाही. कदाचित चेंडूवर थुंकीचा वापराचा पर्याय मिळू शकतो. याव्यतिरिक्त फार बदल होतील, असे मला वाटत नाही.’
गंभीर पुढे म्हणाला,‘खेळाडू व अन्य सर्वांना या व्हायरससह जगण्याची गरज भासेल, कदाचित त्यांना एक व्हायरस असून तो नेहमी राहील, त्याची सवय करवून घ्यावी लागेल. खेळाडूंना याची लागणही होऊ शकते, पण सर्वांना यासोबत रहावे लागेल.’
क्रिकेटमध्ये काही अंशी फिजिकल डिस्टन्स शक्य आहे, पण अन्य खेळांमध्ये हे कठीण असेल.
गंभीर पुढे म्हणाला, ‘फिजिकल डिस्टन्स व अन्य नियम कुठल्याही खेळामध्ये कायम ठेवणे सोपे नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला हे शक्य होईल, पण फुटबॉल, हॉकी आणि अन्य खेळामध्ये हे कसे शक्य होईल. त्यामुळे मला वाटते की आपल्याला या व्हायरससह जगावे लागेल आणि हे जेवढ्या लवकर आपण स्वीकारू तेवढे चांगले आहे.’ (वृत्तसंस्था)