पनवेल : दुबईतील शारजाहमध्ये 10PL वर्ल्ड कप टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्य़ात आले होते. या स्पर्धेमध्ये रायगड आणि पनवेलच्या संघांनीही सहभाग घेतला होता. या खेळाडूंना कोरोना संशयित म्हणून १४ दिवसांच्या निरिक्षणाखाली खारघरमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, प्रशासनातील सावळ्या गोंधळामुळे सर्व खेळाडू घरी निघून गेल्याने खळबळ उडाली आहे.
दुबईहून आज सकाळी 18 खेळाडू मुंबईत आले होते. त्यांना पनवेल महापालिकेने खास बस करून रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. येथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर या सर्व खेळाडूंना खारघर येथील ग्रामविकास भवनामध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, डॉक्टरांनी केवळ तीन जणांना थांबवून अन्य 15 जणांना घरी सोडून दिले. यामुळे ठेवायचे असेल तर सर्वांनाच ठेवा नाहीतर आम्हीही जातो, असा पवित्रा या खेळाडूंनी घेतला.
रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी; पोलीस खात्याचा महत्त्वाचा निर्णय
तळोज्यामध्ये काल कोरोनाचा रुग्ण सापडल्याने पनवेल, रायगडमध्ये खळबळ उडाली होती. यामुळे दुबईहून आलेल्या या खेळाडूंबाबत मोठी खबरदारी बाळगण्यात येणार होती. मात्र, जिल्हा आणि पालिका प्रशासनातील सावळा गोंधळामुळे पुढे धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुबईत कोणती स्पर्धा? दुबईतील शारजाहमध्ये 10 पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 8 ते 13 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यासाठी हे खेळाडू गेले होते. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ड्वेन ब्राव्हो हा या स्पर्धेचा सदिच्छादूत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात प्रत्येकी 16 संघ खेळले होते आणि यंदा 20 संघ खेळले आहेत.