बेंगळुरू : माजी भारतीय कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कोविड-१९ विरुद्धच्या लढाईची तुलना रंगतदार कसोटी सामन्यातील दुसºया डावासोबत केली आहे. त्यात थोडीसुद्धा ढील देणे अंगलट येऊ शकते. कोरोना व्हायरस महामारीमुळे आतापर्यंत जगभरात २ लाख ७६ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर ४० लाखांपेक्षा अधिकांना याची लागण झाली आहे. या महामारीमुळे जगभरात क्रीडा स्पर्धा ठप्प किंवा स्थगित झाल्या आहेत. त्यात टोकियो आॅलिम्पिक, युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप व इंडियन प्रीमियर लीगचाही समावेश आहे.
कुंबळेने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले, ‘जर आपल्याला कोरोना व्हायरस महामारीविरुद्ध लढायचे असेल तर एकजूट व्हावे लागले. ही लढाई एका कसोटी सामन्याप्रमाणे आहे. क्रिकेट कसोटी सामना पाच दिवसांचा असतो, पण ही लढाई बºयाच दिवसांपासून सुरू आहे. कसोटी सामन्यात प्रत्येक संघाला दोन डाव खेळायचे असतात, पण येथे त्यापेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे आत्ममश्गूल राहू नका. आपण पहिल्या डावात थोडी आघाडी घेतली आहे, पण दुसरा डाव त्यापेक्षा खडतर असू शकतो.’ कुंबळेने पुढे म्हटले की, ‘आपल्याला ही लढाई जिंकावी लागेल. ती पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर जिंकता येत नाही. आम्हाला कोरोनाला चित करीत जिंकावे लागेल. दरम्यान, माजी लेगस्पिनरने स्वास्थ्य कर्मचारी व कार्यालयात जाणाºया अन्य कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. (वृत्तसंस्था)