नवी दिल्ली : आयसीसीचा पुढील चेअरमन कोण असेल, या प्रश्नाचे गूढ वाढत चालले आहे. यात अनेक या पदासाठी दावेदार आहेत, असे नाही. सर्वानुमते या पदासाठी निवड केली जाते. पण, यावेळी मात्र कालावधी वाढत असल्यामुळे चेअरमनपदासाठी चर्वितचर्वण सुरू आहे. एवढेच काय तर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
त्याचसोबत कधी दक्षिण आफ्रिकेतर्फे ग्रॅमी स्मिथ या पदासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नाव पुढे करतात तर दुसऱ्याच दिवशी क्रिकेट दक्षिण आफ्रिका याचे खंडन पाठविते. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अहसान मणी यांना या पदासाठी दावेदार म्हटले गेले, पण दुसऱ्याच दिवशी स्वत: पीसीबी प्रमुखांनी स्वत:ला यापासून वेगळे केले. (वृत्तसंस्था)
केव्हा होणार निवडणूक
मनोहर यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे, पण कोविड-१९ महामारीमुळे त्यांना जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान, गेल्या दोन (२८ मे व १० जून) बैठकांमध्ये निवडणूक प्रक्रियेवर चर्चा होईल, अशी आशा होती, पण ती टाळण्यात आली. पुढील बैठक जुलैमध्ये केव्हा होईल आणि केव्हा निवडणूक घेण्यात येईल, याची माहिती मिळालेली नाही.
ग्रेव्स यांना पसंती मिळण्याची शक्यता
सध्या या पदासाठी ईसीबीचे प्रमुख कोलिन ग्रेव्स तगडे दावेदार असल्याची चर्चा आहे. त्यांना बीसीसीआय व क्रिकेट आॅस्ट्रेलियाकडूनही समर्थन मिळण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. स्वत: ग्रेव्स आयसीसी चेअरमन होण्यास इच्छुक आहेत. पण, सध्या जसा माहोल आहे त्यावरुन ग्रेव्स हेच पुढील आयसीसी चेअरमन असतील, हे सांगणे कठीण आहे. कारण अखेरच्या क्षणी कुणी नवा दावेदार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनोहर मैदान सोडतील ? : सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अॅड. शशांक मनोहर निवडणुकीपासून स्वत:ला अलिप्त ठेवतील? स्वत: मनोहर यांनी आयसीसी चेअरमन म्हणून तिसºया कार्यकाळासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले. त्यानंतर बीसीसीआयतर्फे म्हटले जाते की अखेरच्या क्षणी मनोहर तिसरी टर्म पूर्ण करण्यास सहमती दर्शवू शकतात. बीसीसीआयच्या या शक्यतेमध्ये तथ्यही आहे. आयसीसीमध्ये मनोहर समर्थकांची संख्या अधिक आहे.