भारतीय संघ पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपला दबदबा दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. एका बाजूला या स्पर्धेत भारतीय संघ दिमाखदार कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूला संघातील खेळाडूंना नाहक ट्रोल करण्याचा खेळ रंगला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी 'फॅटमॅन'चा टॅग लावल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यात आता मोहम्मद शमीसंदर्भातील नव्या प्रकरणाची भर पडलीये. मोहम्मद शमीच्या एका फोटोवरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धार्मिक मुद्द्यावरुन शमी ट्रोल
मोहम्मद शमीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक्स पिताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवरून धार्मिक मुद्द्याला हात घालत काही कट्टर पंथियांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. बरेलीच्या एका मुस्लीम धर्मगुरु अर्थात मोलानाकडून रमजानचा महिना सुरु असताना शमीनं रोजा (उपवास) न करणं म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच आहे, अशी कमेंट केलीये. काहीजण या धर्मगुरुच्या वक्तव्याची री ओढत शमीला ट्रोल करण्यास सुरुवात केलीये. पण काहीजण मोहम्मद शमीच्या समर्थनात उतरल्याचेही दिसून येते.
हा शमीचा मोठा गुन्हा, मोलानांनी दिला इस्लामचा दाखला
बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मोहम्मद शमी संदर्भात म्हटलंय की, रोजा न पकडता शमीनं मोठा गुन्हा केला आहे. इस्लाममध्ये रोजा पाळणं हे प्रत्येक मुस्लीमाचे कर्म आहे. त्यामुळे शरियतनुसार शमी गुन्हेगार ठरतो, अशा आशयाचे वक्तव्य करत या धर्मगुरूनं शमीवर निशाणा साधलाय. मोहम्मद शमीच्या ज्या फोटोवरून या वादाला सुरुवात झालीये तो फोटो भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल मॅच वेळीचा आहे. या सामन्यात मोहम्मद शमीनं टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
शमीच्या पाठिंब्यासाठीही मौलाना आले पुढे
बरेलीच्या मौलानांकडून मोहम्मद शमीवर निशाणा साधण्यात आला असला तरी अन्य काही मौलानांनी पुढे येत शमीला पाठिंबा दिला आहे. दिल्ली येथील मौलाना अरशद यांनी शमीला ट्रोल करणाऱ्यांची फिरकी घेतलीये. जे लोक शमीला ट्रोल करत आहेत त्यांना ना इस्मामबद्दल काही माहिती आहे ना कुराणबद्दल. मुसाफिर अर्थात प्रवाशाला रमजानमध्ये रोजा पकडण्यापासून सूट असते. शमी सध्या देशाबाहेर आहे. त्यामुळे त्यालाही ही सूट आहे, असे ते म्हणाले आहेत.