Join us

वेगवान मारा खेळण्यास सज्ज: चेतेश्वर पुजारा

रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 08:18 IST

Open in App

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजांना उपयुक्त खेळपट्ट्यांवर  आमचे फलंदाज धावा काढण्यास सज्ज आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात येथे चांगली कामगिरी करेल, यात शंका नाही, असे मत भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गुरुवारी व्यक्त केले. अलीकडे विदेशात मिळविलेल्या विजयांमुळे भारताचा आत्मविश्वास वाढला असून याचा प्रभाव रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळेल,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत पुजारा म्हणाला, ‘आपण विदेश दौरा करतो त्यावेळी खेळपट्ट्या वेगवान असतील आणि चेंडू अखेरच्या क्षणी वळणघेतील, हे डोक्यात असतेच. भारताबाहेर वेगवान माऱ्याला तोंड देणे नेहमी आव्हानात्मक मानले जाते. या संघाने मात्र सर्व गोष्टींवर मात केली. आमच्या संघात संतुलित फलंदाजी आहे. तयारी पाहता या दौऱ्यात आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास वाटतो.’ 

द. आफ्रिकेत खेळण्याचा अनुभव संघाला उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत सौराष्ट्रचा हा खेळाडू म्हणाला, ‘आमचे अनेक खेळाडू आधी येथे खेळले असून त्यांना अनुभव आहे.  तयारीच्या वेळी आम्ही प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली. अनेक संघ घरच्या खेळपट्ट्यांवर  प्रभावी कामगिरी करतात. द. आफ्रिका याला अपवाद नाही. यजमान संघात सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची फळी आहे. त्यांचे आव्हान परतवून लावणे खडतर असेल. तथापि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाचा भारताला लाभ होईल.  विदेशात जिंकू शकतो, असा विश्वास भारतीय संघात संचारला. कुठल्याही स्थितीत आमचे युवा आणि अनुभवी खेळाडू चांगली कामगिरी बजावू शकतात. द. आफ्रिकेत मालिका विजयासाठी आम्ही सक्षम आहोत.’

पुजाराने अखेरचे कसोटी शतक जानेवारी २०१९ ला ऑस्ट्रेलियात नोंदविले होते. मागील दहा डावात त्याने दोनच अर्धशतके ठोकली. २०२० पासून पुजाराच्या फलंदाजीत सातत्य दिसलेच नाही. पुजाराने याआधी २०११, २०१३ आणि २०१७ ला दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. 

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका
Open in App