Cheteshwar Pujara brother in law suicide: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याच्या घरात एक दु:खद घटना घडली आहे. चेतेश्वर पुजाराचा मेहुणा जीत पाबारी याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला जीत पाबारीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांना आज एक वर्ष पूर्ण झाले. बरोबर एक वर्षानंतरच त्याने टोकाचे पाऊल उचलले. जीत पाबारीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ही घटना घडली तेव्हा चेतेश्वर पुजारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे समालोचन करत होता.
जीत कशामुळे चिंतेत होता?
नोव्हेंबर २०२४ मध्ये जीत पाबारीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्याशी एका मुलीचे लग्न ठरले होते. पण नंतर त्यांचे लग्न मोडले. तेव्हा तिने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. राजकोटमध्ये राहणाऱ्या या मुलीने दावा केला होता की जीतने साखरपुडा झाल्यानंतर अनेक वेळा तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. त्यानंतर कोणतेही कारण नसताना त्याने लग्न मोडले आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केले. तसेच, जीतने चेतेश्वर पुजाराचे नाव वापरून तिला वारंवार धमक्या दिल्या, असाही आरोप तिने केला आहे. मुलीने जीत पाबारीवरही मारहाणीचाही आरोप केला होता. त्यानंतर जीत काही काळापासून नैराश्यावस्थेत होता असे वृत्त आहे.
जीत पाबारीचा मृत्यू कसा झाला?
मिळालेल्या वृत्तानुसार, राजकोटमध्ये राहणारा जीत पाबारी याने त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असला तरीही मृतदेहाच्या आसपास कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही.