CSL IPL 2023 । नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) युवा खेळाडू शेख रशीदने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सीएसकेचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दलचा एक भावनिक किस्सा सांगितला आहे. रशीदचा हा व्हिडीओ सीएसकेने युट्यूबवर पोस्ट केला आहे. यामध्ये रशीदने खुलासा केला की, एमएस धोनी एकेकाळी ज्या 'रिबॉक' बॅटने खेळायचा ती बॅट तो खरेदी करू शकत नव्हता.
शेख रशीदने खुलासा करताना म्हटले, "मी आठ वर्षांचा असताना माझ्या वाढदिवशी मी माझ्या वडिलांना सांगितले की मला रिबॉक बॅट हवी आहे. कारण धोनीभाईने ती बॅट वापरली होती. पण त्यावेळी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळेच आम्हाला ती बॅट खरेदी करता आली नाही. आयुष्यातील महत्त्वाच्याच दिवशी ती बॅट खरेदी करता न आल्याने मी दिवसभर रडत राहिलो."
CSK चा युवा खेळाडू भावूक
तसेच मी एका सामन्यादरम्यान बॉल बॉय म्हणून सीमारेषेजवळ होतो, जिथे मी कोणालातरी रिबॉक बॅट वापरताना पाहिले आणि मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. कारण मला त्या बॅटने खेळायचे होते, असे रशीदने आणखी सांगितले. खरं तर आयपीएल २०२३ च्या लिलावात CSK ने २० लाखांमध्ये शेखला आपल्या ताफ्यात घेतले. शेख रशीदने धोनीसोबतच्या पहिल्या संभाषणाबद्दल म्हटले, "सराव सत्रादरम्यान धोनीभाईची बॅट पकडणे ही एक वेगळीच अनुभूती होती. त्यावेळी सराव सत्रात धोनी भाईने काही मौल्यवान सल्ले दिले."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"