चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत महेंद्रसिंह धोनी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळेल, अशी माहिती सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग यांनी दिली.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) आयपीएलचा सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्याच्यापूर्वीच चेन्नईच्या संघाला ऋतुराज गायकवाडच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. कोपराच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाला आहे. संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याबाबत माहिती दिली. तसेच त्याच्याऐवजी धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करेल, असेही ते म्हणाले.
चेन्नईच्या संघाला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कोलकाताविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चेन्नईला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध १८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
चेन्नई सुपरकिंग्जची निराशाजनक कामगिरीआयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत चेन्नईने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर संघाला सलग चार सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.