Join us
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑनलाइन तिकीट विक्री उद्यापासून; भारत-पाक सामन्याचे तिकीट किती?

ICC Champions Trophy 2025 Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये होणार आहे. ICC ने तिकिटांचे दर जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:23 IST

Open in App

ICC Champions Trophy 2025 Match Tickets : पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ज्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, तो म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 10 सामन्यांसाठी (दुसऱ्या उपांत्य फेरीसह) तिकिटांचे दर जाहीर केले आहेत.

तिकिटांची ऑनलाइन विक्री मंगळवारपासून (28 जानेवारी) सुरू होणार आहे. तिकीट खिडकी भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता उघडेल. तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल, जी आधीच सुरू झाली आहे. सर्वात स्वस्त तिकीट 1000 पाकिस्तानी रुपये ठेवण्यात आले आहे, जे भारतीय रुपयांमध्ये 310 रुपये असेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PBC) ने नुकतेच आपल्या घरच्या सामन्यांच्या तिकिटांच्या किमती जाहीर केल्या आहेत. म्हणजेच कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांचे दर समोर आले आहेत.    

पाकिस्तान-बांग्लादेश सामन्याचे तिकीट 620 रुपये भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. येथे उपांत्य फेरीही होणार आहे. या सर्व सामन्यांच्या तिकिटांचे दर अद्याप समोर आले नाहीत. दुबईत होणाऱ्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्रीही लवकरच सुरू केली जाईल, असे आयसीसीने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानी बोर्डाने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांचे सर्वात स्वस्त तिकीट 1000 पाकिस्तानी रुपये (सुमारे 310 भारतीय रुपये) ठेवले आहे. तर पाकिस्तान-बांग्लादेश सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट 2000 पाकिस्तानी रुपये (सुमारे 620 भारतीय रुपये) आहे. हा सामना रावळपिंडी येथे होणार आहे.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत...

पाकिस्तानमध्ये फक्त एकच उपांत्य फेरीचा सामना होणार आहे, ज्याच्या तिकीटाची किंमत 2500 पाकिस्तानी रुपयांपासून (776 भारतीय रुपये) सुरू होईल. तर, VVIP तिकिटाची किंमत 12000 पाकिस्तानी रुपये (3726 भारतीय रुपये) ठेवण्यात आली आहे. उपांत्य फेरीतील व्हीव्हीआयपी तिकिटासाठी तुम्हाला 25000 पाकिस्तानी रुपये (7764 भारतीय रुपये) खर्च करावे लागतील. प्रीमियर गॅलरीच्या तिकिटांच्या किंमती स्टेडियमनुसार असतील. कराचीतील प्रीमियर गॅलरीचे तिकीट 3500 पाकिस्तानी रुपये (1086 भारतीय रुपये) असेल.तर लाहोरमध्ये पाकिस्तान-बांग्लादेश सामन्याचे तिकीट 5000 पाकिस्तानी रुपये (1550 भारतीय रुपये) आणि रावळपिंडीमध्ये होणाऱ्या पाकिस्तान-बांग्लादेश सामन्याचे तिकीट 7000 पाकिस्तानी रुपये (2170 भारतीय रुपये) असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्ण वेळापत्रक

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर1 मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई4 मार्च- उपांत्य फेरी-1,  दुबई5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर9 मार्च - अंतिम, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)10 मार्च - राखीव दिवस

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान