चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत भारतीय संघानं दिमाखात फायनल गाठलीये. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीीय संघ आयसीसी स्पर्धेची आणखी एक फायनल खेळताना दिसणार आहे. एका बाजूला संघ चांगली कामगिरी करत असला तरी कॅप्टनचा हिट शो दिसेनासा झालाय. त्यामुळे रोहित शर्माच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयानंतर गौतम गंभीरनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला रोहितच्या फलंदाजीतील कामगिरीबद्दल प्रश्न विचारला होता. यावर गौतम गंभीरनं सॉलिड रिप्लाय देत भारतीय कर्णधाराची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीरकडून रोहित शर्माची पाठराखण
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मा धावा करण्यात भलेही अपयशी ठरला असेल. पण कर्णधाराच्या रुपात त्याने ड्रेसिंग रुममध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे. ज्याचा संघाला फायदा झालाय, असे मत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
रोहितच्या कामगिरीबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर?
रोहित शर्माच्या बॅटिंग अप्रोचबद्दल ज्यावेळी गंभीरला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की, अजून तर फायनल मॅच बाकी आहे. त्याआधी मी काय बोलू. तुम्ही फलंदाजाने केलेल्या धावसंख्येवरून त्याचे मूल्यांकन करता. पण आम्ही (संघ व्यवस्थापन) त्याचा इम्पॅक्ट किती ते बघतो. हाच फरक आहे. असे म्हणत गंभीरनं रोहित शर्माचा दृष्टिकोन टीम इंडियासाठी फायदाचा ठरतोय, असे म्हटले आहे. रोहित बेधडक अंदाजात खेळत ड्रेसिंगरुममध्ये एक सकारात्मक संदेश देतो. कोच आणि टीमच्या रुपात आमच्यासाठी त्याच्या धावा आणि सरासरीपेक्षा त्याचा अप्रोच महत्त्वाचा आहे, असे सांगत गंभीरनं रोहित हा टीम इंडियाच्या यशात इम्पॅक्ट टाकणारा कॅप्टन आहे, असे म्हटले आहे.
४ सामन्यात रोहितच्या भात्यातून आल्या फक्त १०४ धावा, पण...
रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या ४ सामन्यात २६ च्या सरासरीनं १०४ धावा केल्या आहेत. यात ४१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याच आकडेवारीवरून रोहित शर्माच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. पण कोच गंभीरनं आकडे बघू नका रिझल्ट पाहा, असे काहीसे म्हणत, रोहित शर्माला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी तो संघाच्या यशात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतोय, असे कोच गंभीरनं म्हटले आहे.