भारतीय संघानं आयसीसी ट्रॉफी जिंकली अन् कॅप्टन रोहित शर्मानं निवृत्तीसंदर्भात रंगलेल्या चर्चेचा विषयही संपवला. निवृत्तीच्या अफवा पसरवू नका, असे म्हण त्याने यापुढेही टीम इंडियाकडून वनडे खेळणार असल्याचे स्पष्ट केले. आता त्याचा हाच मुद्दा धरून जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिने रोहित शर्माला निवृत्तीच्या पलिकडचं प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंही अगदी दिलखुलास अंदाजात मनातील गोष्टही मग तिच्यासमोर बोलून दाखवली. जाणून घेऊयात बुमराहच्या बायकोच्या 'बोलंदाजी'चा रोहितनं कसा केला सामना त्यासंदर्भातील खास स्टोरी
संजनानं हलक्या फुलक्या प्रश्नानं केली सुरुवात
सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात आता जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा नजारा अन् रोहित शर्मा आणि संजना यांच्यातील रंगलेल्या गप्पा गोष्टींची भर पडली आहे. या खास मुलाखतीमध्ये संजनानं २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपचा दाखला देत आधी सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितच्या मनात काय सुरुये हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात रोहित म्हणाला की, कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकणं खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. कारण इथं अनेक आव्हाने असतात. त्याचा सामना करून तुम्ही पुढे जाता, असे रोहित म्हणाला.
मग तिने रोहितला मारला 'बाऊन्सर'
संजना गणेशन हिने खास मुलाखतीमध्ये रोहितला मग निवृत्तीपलिकडचा प्रश्न विचारला. निवृत्तीच्या निर्णयाला पूर्ण विराम दिल्यावर भविष्याचा प्लान काय? २०२७ चा वनडे वर्ल्ड डोळ्यासमोर आहे का? अशा आशयाचा प्रश्न विचारत मग तिने रोहितला एक बाऊन्सरच मारला. यावर रोहितनं अगदी संयमीरित्या सामना केला. "मी सध्या चांगला खेळतोय. एवढ्या पुढच्या गोष्टीचा विचार केलेला नाही. सर्व पर्याय खुले ठेवलेत. सध्या मी क्रिकेटचा आनंद घेतोय आणि संघातील अन्य मंडळीही माझ्यासोबत आनंदी आहेत."
विराटच्या वक्तव्यावरही विचारला रोहितला प्रश्न
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यावर स्टार क्रिकेटर विराट कोहली याने टीम इंडिया पुढचे १० वर्षे क्रिकेट जगतात आपला दबदबा दाखवून देईल, असे म्हटले होते. यावर रोहितला काय वाटते? असा प्रश्न संजनाने विचारल्याचे पाहायला मिळाले. यावर रोहित म्हणाला की, ८-१० वर्षांनी आम्ही कुठे असेल माहिती नाही. पण सध्याच्या घडी आपला टी-२० सेटअप पाहिला तर यात 'न्यू इंडिया'ची झलक दिसते. या संघात अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत.