भारतीय संघाचे स्टार फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी खेळाच्या या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून अर्थात टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आता, त्यांच्या वन डे क्रिकेटमधून निवृत्तीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात, माजी क्रिकेटर आकाश चोप्राने आपले मत व्यक्त केले आहे. चोप्रा म्हणाला, हा निर्णय खेळाडू घेतील. मात्र त्यांनी असे केले तर, त्यांच्या निर्णयाविरुद्ध युक्तिवाद करणे कठीण होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना ९ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. याच पद्धतीने ते, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर ५० षटकांच्या फॉरमॅटसंदर्भातही निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज अनेक जण बांधत आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, "हे पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून आहे. मी प्रामाणिकपणे सांगेन की, हे सोपे नसेल. कोहलीने 2025 मध्ये दमदार कामगिरी केले आहे. तर रोहितचीही कामगिरी बरी राहिली आहे. त्यांची कामगिरी चांगली राहिली असे मी म्हणणार नाही. ते अंतिम सामन्यातही शतक झळकावून हे चित्र बदलू शकता."
चोप्रा पुढे म्हणाला, "ते निवृत्त होतील का? असे मला कुणी तरी विचारले. मी म्हणालो, मला माहित नाही. टी-२० विश्वचषकानंतर त्यांचा निवृत्तीचा निर्णय तर्कसंगत वाटत होता. पण त्यांनी टी-२० आणि एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, तर त्यांच्याकडे केवळ कसोटी सामनेच राहतील. ते त्याच मार्गाने जाणार का? कोणास ठाऊक.''