India vs Pakistan : ICC Champions Trophy 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'हायब्रिड मॉडेल'वर आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई (संयुक्त अरब अमिराती) येथे होणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात एक करारही झाला आहे. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. तर उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे.
हा झाला करार...
BCCI आणि PCB या दोघांनी T20 World Cup 2026 च्या साखळी सामन्यांसाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही यावर तत्वतः सहमती दर्शवली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. हायब्रीड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केल्यामुळे पीसीबीला कोणतीही भरपाई मिळणार नाही. पण त्याऐवजी पाकिस्तानला २०२७ नंतरच्या एखाद्या आयसीसी महिलांच्या स्पर्धेचे यजमानपद दिले जाईल.
या स्पर्धेसाठी भारत सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत 'हायब्रीड मॉडेल' हा एकमेव पर्याय होता. बीसीसीआयनेआयसीसीला पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली होती. आयसीसीच्या बैठकीत पीसीबीने 'हायब्रीड मॉडेल' अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक नसल्यावर जोर दिला होत, पण अखेर त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागली.
१९९६ नंतर पाकिस्तानची पहिलीच आयसीसी स्पर्धा
१९९६ च्या विश्वचषकानंतर पाकिस्तानची ही पहिली ICC स्पर्धा आहे. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेचे सह-यजमान होते. भारत आणि पाकिस्तान यांनी २०१२ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही, परंतु गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासह आयसीसी स्पर्धांमध्ये ते एकमेकांसमोर आले आहेत. गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने आयोजित केलेला आशिया चषकही 'हायब्रीड मॉडेल'मध्ये बदलण्यात आला होता. त्यानंतर भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले.