आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान, हा हाय होल्टेज सामना रविवारी खेळला जाणार आहे. सर्वच चाहते या सामन्याची वाट बघत आहेत. दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या सामन्या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. भारत या आयसीसी स्पर्धाेतही पाकिस्तानविरुद्धचा आपला उत्कृष्ट रेकॉर्ड कायम ठेवेल, अशी आशा गांगुलीने व्यक्त केली आहे. तो म्हणाला, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारत अत्यंत मजबूत संघ आहे. भारत हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार तर आहेच, शिवाय, टोर्नामेंट अथवा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचाही प्रबळ दावेदार आहे.
विराट कोहली लेग स्पिन खेळण्याच्या कमकुवतपणावर मात करू शकेल -यावेळी, विराट कोहली लेग स्पिन खेळण्याच्या कमकुवतपणावरही मात करू शकेल, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला आहे. याच बरोबर गांगुली म्हणाला, भारताकडे सहाव्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत जे शतके ठोकू शकतात आणि संघाला सामने जिंकून देऊ शकतात. जर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर यावरून भारतीय फलंदाजीची अंदाज येऊ शकतो.
एकदिवसीय सामन्यांतील केएल राहुलची कामगिरी चांगली -गांगुलीने एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, "भारतीय संघ, हा एक अतिशय मजबूत संघ आहे, विशेषतः फलंदाजीच्या दृष्टीने. पंत अत्यंत चांगला खेळाडू आहे. मात्र, एकदिवसीय सामन्यांतील केएल राहुलची कामगिरी चांगली आहे. यामुळे गौतम गंभीर राहुलचे समर्थन करत असावा, असे मला वाटते. गांगुली म्हणाला, खरे तर या दोघांपैकी एकाची निवड करणे, हे अत्यंत कठीण काम आहे. कारण दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत."