PCB Chief sells VIP Box tickets, Champions Trophy 2025 IND v PAK: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी दुबई स्टेडियमवर केवळ चाहतेच नव्हे तर दोन्ही देशांतील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देखील दिसणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी हे देखील या सामन्याला उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान, मोठी बातमी अशी आहे की मोहसिन नक्वी ( Mohsin Naqvi ) यांना या सामन्यासाठी ३० आसनी व्हीआयपी हॉस्पिटॅलिटी बॉक्स देण्यात आला होता, जेणेकरून ते त्यांच्या जवळच्या लोकांसह आणि कुटुंबासह सामना पाहू शकतील. परंतु नक्वी यांनी चाहत्यांसह स्टँडमध्ये बसून सामना पाहण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्हीआयपी बॉक्स स्वत:पुरता न ठेवता ती तिकिटे त्यांनी विकली असल्याचा दावा केला जात आहे.
व्हीआयपी बॉक्स तिकिटे विकून कमाई
समा टीव्हीच्या एका वृत्तानुसार, मोहसिन नक्वी यांनी व्हीआयपी बॉक्सची ऑफर नाकारली आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधील सामना स्टँडमधून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्सची किंमत ४ लाख अमेरिकन डॉलर्स (३.४७ कोटी रुपये) आहे. नक्वी यांनी पैशासाठी असा निर्णय का घेतला? असा प्रश्न असा विचारला जात आहे. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे पुरेसे पैसेही शिल्लक नाहीत का जेणेकरून पीसीबी प्रमुखांना व्हीआयपी बॉक्स तिकिटे विकावी लागत आहेत, असाही सवाल केला जात आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान सहाव्यांदा आमनेसामने येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९९८ मध्ये झाली. २०१७ पर्यंत त्याचे आठ सीझन होते, आता आठ वर्षांनी नववा सीझन होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान एकूण पाच वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे आहे. कारण भारताने फक्त दोन सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये भारताने गट फेरीत पाकिस्तानला हरवले होते पण अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला हरवले.