Join us

CT 2025: पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा जोरदार धक्का; न्यूझीलंडची विजयी सलामी

Pakistan vs New Zealand, Champions Trophy 2025: न्यूझीलंडने दोन शतके ठोकली तर पाकिस्तानकडून एकही शतकवीर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 22:56 IST

Open in App

Pakistan vs New Zealand, Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने यजमान पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टॉम लॅथम ( नाबाद ११८ ) आणि विल यंग ( १०७ ) यांच्या शतकांच्या जोरावर ५० षटकांत ५ बाद ३२० धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला ४७.२ षटकांत २६० धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून खुशदिल शाह ( ६९ ) आणि बाबर आजम ( ६४ ) यांनी अर्धशतके केली. परंतु त्यांची फलंदाजी पाकिस्तानला पराभवापासून वाचवू शकली नाही. न्यूझीलंडकडून विल ओ'रुरके आणि मिचल सँटनर यांनी प्रत्येकी तीन बळी घेऊन यजमानांना पराभूत केले.

न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात फारच खराब झाली होती. सलामीवीर डेवॉन कॉन्वे (१०), अनुभवी केन विल्यम्सन (१) तर डॅरेल मिचेल (१०) स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ७३ इतकी होती. त्यानंतर सलामीवीर विल यंग आणि टॉम लॅथम या दोघांमध्ये दमदार भागीदारी झाली. विल यंगने ११३ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकार मारत १०७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स याने टॉम लॅथम याची साथ दिली. फिलिप्स ने ३९ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने तुफानी ६१ धावांची खेळी केली. दुसरीकडे टॉम लॅथम नाबाद राहिला. त्याने १०४ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांच्या साथीने ११८ धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह, हॅरीस राऊफ यांनी दोन-दोन तर अबरार अहमद याने एक बळी टिपला.

३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौद शकील अवघ्या सहा धावांवर, कर्णधार मोहम्मद रिझवान तीन धावांवर, फकर जमान २४ धावांवर, तय्यब ताहीर एका धावेवर बाद झाला. बाबर आझमने अनुभव पणाला लावून ९० चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने संयमी ६४ धावांची खेळी केली. सलमान अली अगा याने २८ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावांची वेगवान खेळी केली. तर खुशदिल शाह याने ४९ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६९ धावांची झुंजार खेळी केली. हे बाद झाल्यानंतर तळातील शाहीन आफ्रिदीने १४, नसीम शाहने १३ तर हॅरीस राउफने १९ धावा केल्या. परंतु हे लोक पाकिस्तानला पराभवापासून वाचवू शकले नाहीत. विल ओरुरके, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी तीन, मॅट हेनरीने दोन आणि मायकल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५न्यूझीलंडपाकिस्तानबाबर आजम