Champions Trophy 2025 IND vs BAN : मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशच्या संघाचा डाव २२८ धावांत आटोपला आहे. या सामन्यात बांगलादेशचा अर्धा संघ अवघ्या ३५ धावांत तंबूत परतला होता. पण त्यानंतर तौहीद हृदय (Towhid Hridoy) याने केलेले झुंजारु शतक १०० (११८) आणि त्याला जाकेर अलीनं ६८ (११४) अर्धशतकी खेळीसह दिलेली उत्तम साथ या जोरावर बागंलादेशच्या संघानं ४९.४ षटकात सर्वबाद २२८ धावांपर्यंत मजल मारली. आयसीसी स्पर्धेत मोहम्मद शमीनं पाचव्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या ३५ धावांत बांगलादेशचा अर्धा संघ परतला होता तंबूत
बांगलादेशचा कर्धार शांतोनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर मोहम्मद शमीनं पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. सौमय्या सरकारला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात हर्षित राणानं नमुजल हुसैन शांतोच्या रुपात बांगलादेशच्या संघाला दुसरा धक्का दिला. अवघ्या २ धावांवर बांगलादेशच्या संघानं आपली दुसरी विकेट गमावली होती. शमी पुन्हा आला अन् त्याने मेहदी हसन मिराजला चालते केले. अक्षर पटेलनं आपल्या एकाच षटकात दोन विकेट घेत बांगलादेशची अवस्था ५ बाद ३५ अशी केली. पण त्यानंतर तौहिद अन् जाकर अली जोडी जमली.
भारताकडून गोलंदाजीत तिघांचा जलवा, तिघावर आली विकेट लेस राहण्याची वेळ
अर्धा संघ तंबूत परतल्यावर बांगलादेशचा संघ १५० धावांपर्यंतही पोहचू शकणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. पण तौहीद हृदोय आणि त्याला जाकेर अली या जोडीनं सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. जाकेर अलीनं ११४ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. दुसरीकडे तौहीद हृदय याने आयसीसी स्पर्धेत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले वहिले शतक साजरे करून लक्ष वेधून घेतले. तो शेवटच्या षटकापर्यंत मैदानात होता. अखेरच्या षटकात हर्षित राणाने त्याची विकेट घेतली. भारताकडून मोहम्दम शमीनं १० षटकांच्या कोट्यात ५३ धावा खर्च करत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय हर्षित राणानं ७.४ षटकात ३१ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलनं २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याला ४ षटकात एकही विकेट हाती लागली नाही. याशिवाय कुलदीप यादवनं १० षटकाच्या कोट्यात ४३ धावा खर्च केल्या. पण त्यालाही विकेट मिळाली नाही. जड्डूही ९ ओव्हर टाकून विकेट लेस राहिला.