कोहली अन् सेंच्युरी यांच्यातील लव्ह अफेअर काही नवं नाही. कोहली मैदानात आला की, त्यानं सेंच्युरी मारूनच परतावे, अशी प्रत्येकाची आस असते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही ती होती. पण कोहलीला मॅच जिंकायची होती. मॅच आधी कोहलीनं वैयक्तिक कामगिरीवरील प्रश्नावर मी किती धावा केल्या त्यापेक्षा संघासाठी जे काम करायला हवे, ते करण्यावर अधिक फोकस देतो, असे कोहली म्हणाला होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही तो त्याच तोऱ्यात खेळताना दिसले. वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेट अशा सर्व प्रकारात शतक नावे असलेल्या कोहलीच्या भात्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकही शतक नव्हते. त्यामुळे तो शतका जवळ आल्यावर मॅचसोबत त्याचं शतकही पाहायला मिळावं, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात होती. पण कोहली मात्र हे सगळं बाजूला ठेवून संघाला विजय मिळवून देण्यात मग्न होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अक्षर पटेलनं कोहलीला स्ट्राइकवर ठेवण्यासाठी दुसरी धाव टाळली, कोहली चिडलाही, पण...
हार्दिक पांड्याची विकेट पडल्यावर अक्षर पटेल मैदानात उतरला त्यावेळी विराट कोहली १०० चेंडूत ८६ धावांवर खेळत होता. भारताच्या धावफलकावर ४ बाद २२३ धावा लागल्या होत्या. भारतीय संघाला विजयासाठी १९ तर कोहलीच्या शतकासाठी १४ धावांची गरज होती. अक्षर पटेलनं कोहलीच्या शतकासाठी जिथं सहज दोन धावा होत होत्या तिथं एकच धाव काढली. कोहली दुसऱ्या धावेसाठी इच्छुक होता. पण बापूच्या मनातही तो स्ट्राइकवर रहावा अन् शतक व्हावे, ही इच्छा होती. कोहली त्याच्या या गोष्टीवर जरा चिडल्याचेही दिसले. पण शेवटी त्याने अक्षरचा मान अन् टीम इंडियाची शान राखत शतक साजरे केले.
पाकच्या गोलदांजांत दिसले नापाक इरादे
एका बाजूला अक्षर पटेल विराटच्या शतकासाठी जोर लावत होता, दुसरीकडे पाक गोलंदाजाच्या मनात 'नापाक' डाव शिजत होता. भारताच्या डावातील ४१ व्या षटकानंतर भारतीय संघाच्या विजयासाठी १७ धावा आणि कोहलीच्या शतकासाठी १३ धावा असा सीन होता. ४२ व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीनं एक नव्हे तर तीन चेंडू वाइड टाकले. त्याची ही गोलंदाजी पाहून तो कोहलीला शतकापासून रोखण्याचा नापाक डाव खेळतोय, असेच चित्र निर्माण झाले होते. पण शेवटी कोहलीचं शतक झालेच. भारतीय संघाला विजयासाठी दोन धावांची गरज असताना कोहली शतकापासून चार धावा दूर होता. त्याने खणखणीत चौकार मारत संघाच्या विजयासह शतकही पूर्ण केले. जे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे पहिले शतक ठरले.