Pakistan Out without Win, PAK vs BAN Champions Trophy 2025: अनेक वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. पण त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर हसावे की रडावे हेच क्रिकेटप्रेमींना कळेनासे झाले आहे. पाकिस्तानला या स्पर्धेतून एकही विजय न मिळवता बाहेर व्हावे लागले आहे. त्यामुळेच पाकिस्तानने केलेला सर्वप्रकारचा खर्च पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र आहे. सुरुवातीला न्यूझीलंड आणि नंतर भारताने पाकिस्तान पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आज बांगलादेश विरूद्ध विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड करण्याची पाकिस्तानची इच्छा होती. पण त्यांची विजयी निरोप घेण्याची आशाही भंगली. पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश सामना पावसामुळे नाणेफेकही न होता रद्द करण्यात आला. त्यामुळे साखळी फेरीत ३ पैकी एकही विजय न मिळवता पाकिस्तानला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
बांगलादेशने आधीच स्वत:सोबत नेलं होतं बाहेर
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध केली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर, जेव्हा भारताविरुद्ध विजयाची संधी होती, तेव्हा रिझवान अँड कंपनी हाराकिरी सुरुच ठेवली. सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतून जवळपास बाहेर पडलाच होता. बांगलादेशचा न्यूझीलंडवरील विजय ही शेवटची आशा होती, परंतु तसे होऊ शकले नाही. त्यामुळे बांगलादेशच्या पराभवासह ते पाकिस्तानलाही स्पर्धेबाहेर घेऊन गेले.
विजयी निरोप घेण्याची आशाही ठरली फोल
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय अपेक्षित होता. पण इथे संघाला खेळण्याची संधीच मिळाली नाही. दोन्ही संघांनी टॉससाठी काही तास वाट पाहिली, पण पाऊस थांबला नाही. त्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निरोप घेण्याचे पाकिस्तान स्वप्नही भंगले.