Champions Trophy 2025 : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रविवारी( 9 मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले. न्यीझीलंडने दिलेले 252 धावांचे आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केले. दरम्यान, दुबईत तिरंगा फडकवून टीम इंडियाचे काही खेळाडू आज मायदेशात परतले. यावेळी कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली.
बारा वर्षांनंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचा कप हाती घेतला होता. दरम्यान, दुबईत टीम इंडियाने तिसऱ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयानंतर भारतात ठिकठिकाणी चाहत्यांकडून फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. विजयानंतर टीम इंडियाचे काही खेळाडू मायदेशात परतले आहेत. या खेळाडूंचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कुटुंबासह मुंबई विमानतळावर दिसला. त्याला पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.
कर्णधार रोहित शर्माशिवाय श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलदेखील मुंबई विमानतळावर दिसल्याची माहिती आहे. तर, तिकडे दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत वेगवान गोलंदाज हर्षित राणा उतरला. प्रसारमाध्यमांशी न बोलता कारमधून विमानतळाबाहेर गेले. T-20 वर्ल्ड कप 2024 ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुंबईत जंगी बस परेडचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, लवकरच IPL 2025 स्पर्धा सुरू होणार असल्यामुळे यंदा भारतीय संघासाठी बस परेडचे आयोजन करण्यात आले नाही.