Join us

प्रसिद्धला कसोटीत संधी देण्यावर विचार व्हावा; सुनील गावसकर यांचा निवड समितीला सल्ला

२०१८ ला जसप्रीत बुमराह याच्या नावाचा असाच विचार झाला होता हे विशेष. कर्नाटकचा २५ वर्षांच्या प्रसिद्धने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज पदार्पण करीत इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात चार बळी घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:10 IST

Open in App

पुणे : चेंडूतील वेग आणि हवेत फिरविण्याचे कौशल्य असलेला नवोदित वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा कसोटी क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाला चांगले योगदान देऊ शकेल. निवड समितीने त्याच्या नावाचा नक्की विचार करायला हवा, असा सल्ला महान फलंदाज सुनील गावसकर यांनी दिला आहे.

२०१८ ला जसप्रीत बुमराह याच्या नावाचा असाच विचार झाला होता हे विशेष. कर्नाटकचा २५ वर्षांच्या प्रसिद्धने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज पदार्पण करीत इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात चार बळी घेतले. दुसऱ्या सामन्यात ३७व्या षटकांत त्याने दोन गडी बाद केले. त्यात शानदार यॉर्करवर जोस बटलरची दांडी गूल केली. यावर प्रभावित झालेले गावसकर समालोचनादरम्यान म्हणाले, ‘चेंडूवरील सीमवर त्याचे नियंत्रण पाहून मी इतकेच सांगेन की निवड समितीने कसोटी संघात खेळविण्याविषयी त्याच्या नावाचा विचार करावा. जसप्रीत बुमराह हा वन डे आणि टी-२० पाठोपाठ आता कसोटीतही संघाचा अव्वल गोलंदाज बनला आहे. त्याच पद्धतीने प्रसिद्ध हा वेग आणि सीम यावर नियंत्रण राखून लाल चेंडूने अधिक भेदक मारा करू शकतो.’ कृष्णाने प्रथम श्रेणीतील नऊ सामन्यांत ३४ गडी बाद केले आहेत.

‘कृष्ष्णाकडून क्रिकेटच्या सर्वच प्रकारात मला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने पदार्पणातच छाप सोडत अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे त्याला कसोटी संघातही स्थान मिळाले तर तो नक्कीच अपेक्षापूर्ती करेल,’ असेही ते म्हणाले.

नव्या चेंडूवर कामगिरी सुधारायचीय : प्रसिद्धचेंडूतील वेग आणि उसळीमुळे अनेकांना प्रभावित करणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने आणखी भेदक बनण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याची कबुली दिली आहे. प्रसिद्धने दोन्ही सामन्यात गडी बाद तर केले मात्र नव्या चेंडूवर त्याने सुरुवातीला अधिक धावा मोजल्या होत्या.याविषयी तो म्हणाला, ‘मला अधिक चांगली सुरुवात करण्यावर भर द्यावा लागेल. नव्या चेंडूवर धावा जाणार नाहीत आणि फलंदाज बाद होईल, यादृष्टीने काम करावे लागेल. बेयरेस्टो आणि स्टोक्स या आक्रमक फलंदाजांविरुद्ध खराब चेंडू टाकायला नको होते. पाटा खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचे अवघड आव्हान होते.’ 

टॅग्स :सुनील गावसकरभारत