नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. विशेषतः त्याचा 'स्लोअर बॉल' फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतो. मात्र, आता एका पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाने हा स्लोअर बॉल बुमराहला आपणच शिकवल्याचा दावा केल्याने क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. यूएईकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या जाहूर खानने हा खळबळजनक दावा केला आहे.
जाहूर खानने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, २०२० मध्ये जेव्हा कोरोनामुळे आयपीएल यूएईमध्ये खेळवली गेली होती, तेव्हा तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता. जाहूरच्या म्हणण्यानुसार, अबुधाबीतील एका सामन्यानंतर जेव्हा बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी जास्त धावा दिल्या होत्या, तेव्हा सराव सत्रात त्याची बुमराहसोबत चर्चा झाली.
अॅक्शन न बदलता स्लोअर बॉलची जादू
"बुमराह आधीही स्लोअर बॉल टाकायचा, पण त्याची अॅक्शन सामान्य होती. मी त्याला अॅक्शन न बदलता चेंडू कमी वेगाने कसा टाकायचा, याची खास ट्रिक सांगितली," असा दावा जाहूरने केला आहे. त्याने पुढे सांगितले की, "मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला माझ्या स्लोअर बॉल्सबद्दल आधीच माहिती होती कारण मी टी-१० लीगमध्ये एक मेडन ओव्हर टाकली होती. जेव्हा मी सराव सत्रात पहिली यॉर्कर आणि त्यानंतर सलग पाच स्लोअर बॉल टाकले, तेव्हा बुमराह आणि रोहित शर्मा तिथेच बसून माझं निरीक्षण करत होते."
त्या रात्री आम्ही सर्व एकत्र बसलो होतो. झहीर खान आणि रॉबिन सिंग मला ओळखत होते, कारण मी टी-१० लीगमध्ये एक निर्धाव (Maiden) षटक टाकले होते. मी टेबलावर बसलो असताना तिथे खुद्द रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह आले आणि माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले. त्या वेळी जगातील दोन दिग्गज खेळाडू माझ्यासोबत बसून माझ्या गोलंदाजीबद्दल चर्चा करत होते, हे पाहून मी फक्त पाहतच राहिलो, असा दावाही त्याने केला आहे.
६ दिवसांचा क्वारंटाईन आणि ७ व्या दिवशी...!
जाहूरने एका मुलाखतीत सांगितले की, "२०२० मध्ये जेव्हा मला मुंबई इंडियन्सने नेट बॉलर म्हणून बोलावले, तेव्हा नियमानुसार मी ६ दिवस क्वारंटाईन होतो. ७ व्या दिवशी जेव्हा मी प्रत्यक्ष मैदानात सरावासाठी उतरलो, तेव्हा पहिल्याच चेंडूवर मी अचूक यॉर्कर टाकला. त्यानंतरचे पुढचे ५ चेंडू मी माझे खास 'स्लोअर व्हेरिएशन' वापरून फेकले. माझे वैविध्य पाहून नेटमध्ये फलंदाजी करणारे फलंदाजही अवाक झाले होते."