कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून विक्रमांचा पाऊस पडत आहेत. एकीकडे इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार शुभमन गिल याने अनेक विक्रम रचले होते. तर दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर याने विक्रमी शतक ठोकले. मात्र मुल्डर हा ब्रायन लाराच्या कसोटीतील एका डावात ४०० धावा फटकावण्याच्या विक्रमाला मोडित काढणार असं वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने डाव घोषित केला. त्यामुळे मुल्डर याची मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी हुकली.
ब्रायन लारा याने २००४ साली इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. तो विक्रम मागच्या २१ वर्षांपासून अबाधित आहे. या काळात अनेक फलंदाजांनी त्रिशतकी खेळी केल्या. पण त्यांना लाराच्या विक्रमाजवळ जाणेही जमले नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार विचान मुल्डरकडे हा विक्रम मोडण्याची संधी चालून आली होती. झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत मुल्डरने नाबात ३६७ धावा कुटून काढल्या होत्या. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाराचा विक्रम मोडणार असं वाटत होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपला डाव अचानक घोषित केला. त्यामुळे मुल्डरची विक्रमी खेळी करण्याची संघी हुकली. मात्र मुल्डरने केलेली ३६७ धावांची खेळी ही परदेशात कुठल्याही संघाविरुद्ध खेळली गेलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे.
मुल्डरने केलेल्या या खेळीच्या दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव ५ बाद ६२६ धावांवर घोषित केला. त्यानंतक झिम्बाब्चेच्या डावाला खराब सुरुवात झाली असून, त्यांचे सुरुवातीचे ५ फलंदाज बाद झाले आहेत.