अफगाणिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वात खांदेपालट झालेली पाहायला मिळाली. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व आता फिरकीपटू रशीद खानकडे सोपवण्यात आले असून तो तीनही प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये संघाला लीड करेल. आश्चर्याची बाब म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी गुलबदीन नैबकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. असगर अफगान हा उप कर्णधाराच्या भूमिकेत असेल. वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नव्हता.
अफगाणिस्तान क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष दवलत खान अहमदझाई यांनी सांगितले की,''या स्पर्धेत प्रेरणादायी क्रिकेट खेळण्याचे आमचे लक्ष्य होते. या स्पर्धेत बलाढ्य संघ होते आणि आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न झाला.''
वर्ल्ड कपच्या आधी नैबकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण, त्यानं संघाची कामगिरी सुधारली नाही. त्यांना एकही विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड कपपूर्वी अफगानकडे संघाचे नेतृत्व होते, परंतु त्यालाही साजेशी कामगिरी करता आली नव्हती. वर्ल्ड कपमध्येही असगरने 26च्या सरासरीनं 154 धावा केल्या. दुसरीकडे नैबने 21.55 च्या सरासरीनं 194 धावा केल्या. शिवाय गोलंदाजीत त्यानं 9 विकेट घेतल्या.