Join us

BREAKING: ICC World Cup 2019 : भारताच्या 'या' ऑलराऊंडरची वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार

BREAKING: इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 14:01 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात भारताची विजयी मालिका खंडित झाली. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तसे करावे लागले. त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. सलामीवीर शिखर धवननंतर भारताला हा दुसरा मोठा धक्का आहे. 

रोहित शर्मा ( 102), विराट कोहली ( 66) , हार्दिक पांड्या ( 45), महेंद्रसिंग धोनी ( 42) आणि रिषभ पंत ( 32) यांची खेळी व्यर्थ ठरली. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 160 धावांची विक्रमी भागीदारी करून इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यांना जो रूट ( 44) आणि बेन स्टोक्स (79) यांनी धावांचा पाऊस पाडताना इंग्लंडला 337 धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात विजय शंकरला दुखापतीमुळे खेळवण्यात आले नव्हते. त्याच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली होती. पंतने 32 धावांची खेळी केली, परंतु त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेत विजयने तीन सामन्यांत 58 धावा केल्या, तर दोन विकेट घेतल्या. चौथ्या क्रमांकावर संधी मिळूनही त्याला फार योगदान देता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला खेळवण्याची मागणी होत होतीच. त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्यातून सावरण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. 

लोकेश राहुलच्या तंदुरूस्तीबाबत संभ्रम

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करत असताना राहुल पाठिवर पडला आणि त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे राहुलला मैदानाबाहेर पाठवण्यात आले आहे. ही दुखापत जर फार गंभीर असेल तर त्याला या सामन्यात फलंदाजीही करता येणार नाही. जॉनी बेअरस्टोव हा 48 धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी जॉनीने एक मोठा फटका लगावला. हा चेंडू षटकार जाणार की राहुल झेल पकडणार, याबाबत उत्सुकता होती. सीमारेषेवर राहुल झेल पकडायला गेला. पण त्याला चेंडूचा योग्य अंदाज आला नाही. तरीही राहुल झेल पकडायला गेला आणि सीमारेषेबाहेर पाठीवर पडला. त्यावेळी राहुलला दुखापत झाली.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत