Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले! केप टाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव

सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने  पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:26 IST

Open in App

केपटाऊन -  सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने  पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत दुसऱ्या डावात आफ्रिकन फलंदाजांची दाणादाण उडवली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळल्याने भारतासमोर विजयासाठी 208 धावांचे माफक आव्हान होते. मात्र दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारताची फलंदाजीही फिलँडरच्या वेगवान माऱ्यासमोर कोसळली. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीमधील विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुरली विजय आणि शिखर धवन यांनी सावध सुरुवात केली. मात्र आठव्या षटकात धवन (16) आणि नवव्या षटकात विजय (13) धावा काढून बाद झाले. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर भारताची घसरगुंडी उडाली. चेतेश्वर पुजारा (4),  कर्णधार विराट कोहली (28), रोहित शर्मा (10), हार्दिक पांड्या (1) आणि वृद्धिमान साहा (8) हे एकापाठोपाठ एक असे तंबूत परतल्याने चहापानापूर्वीच भारताची अवस्था 7 बाद 82 अशी झाली होती.  आघाडीची फळी कोसळल्यावर रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी 49 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. मात्र अश्विन 37 धावा काढून फिलँडरची शिकार झाल्यानंतर भारताचा डाव फार लांबला नाही. फिलँडरनेच मोहम्मद शमी (4) आणि जसप्रीत बुमरा (0) यांना परतीची वाट दाखवत भारताचा डाव 135 धावांवर संपुष्टात आणला.  तत्पूर्वी चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव भारताच्या भेदक माऱ्यासमोर 130 धावांमध्ये आटोपला.  शमीनं चौथ्या दिवशीच्या दुसऱ्याच षटकांमध्ये धोकादायक हाशीम आमलाला बाद केले. आमला बाद झाल्यानंतर आफ्रिकेची फलंदाजीची फळी पूर्णपण कोलमडली. एबी डीव्हिलर्सने एक बाजू लावून धरत शेवटी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाजांनी निराशा केली. डीव्हिलर्स 35 आणि एल्गर 25 चा अपवाद वगळता एकाही आफ्रिकेच्या फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव धरता आला नाही. अखेर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 130 धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी चार तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन बळी टिपले.  

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका